- विधानसभा उपाध्यक्षांकडून पालिका प्रशासनाला हजर राहण्याची सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ मार्च २०२३) :- प्रशासनाची फसवणूक करून चार वरिष्ठ अधिकारी भरती झाल्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करून महापालिकेने अहवाल सादर करावा, असे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाच्या वतीने तक्रारींची चौकशी सुरू केली आहे.
महापालिकेत शासनाकडून आलेले आणि स्थानिक पातळीवरील अधिकारी असे दोन गट दिसून येतात. महापालिका सेवेत असणारे स्थानिक अधिकारी सत्ताधाऱ्यांशी जवळीक साधून पदोन्नतीचे प्रस्ताव मंजूर करून घेतात आणि प्रथम वर्ग, द्वितीय वर्गाचे लाभ घेत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत.
महापालिकेत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहायक आयुक्त श्रीनिवास दांगट, अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी मेहेर लहारे अशा चौघांनी प्रशासनाची फसवणूक करून भरती झाल्याबाबत एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने विधानसभा उपाध्यक्षांकडे तक्रार केली होती. त्यानुसार महापालिकेकडून अहवाल मागविला होता. त्यानुसार मागील १५ दिवसांपूर्वी अहवाल दिला होता. त्यानंतर पुन्हा १४ मार्चला अधिकाऱ्यांबाबतची माहिती घेऊन समक्ष उपस्थित राहावे, असे पत्र विधानसभा उपाध्यक्षांनी महापालिकेस दिले आहे.
महापालिकेतील चार अधिकाऱ्यांसंदर्भात विधानसभा उपाध्यक्षांकडे तक्रार केली होती. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांपूर्वी समक्ष उपस्थित राहून माहिती दिली होती. त्यानंतर पुन्हा मंगळवारी माहितीचा अहवाल मागविला आहे. महापालिकेच्या वतीने माहिती दिली जाणार आहे.
– विठ्ठल जोशी, उपायुक्त, प्रशासन विभाग.















