न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- आज पिंपरी-चिंचवड मनपाची सर्वसाधरण सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. प्रारंभी शांततेत चालू असलेली सर्वसाधारण सभा नगरसेवक दत्ता साने व सीमा सावळे यांच्या वादातीत टोकाच्या भूमिकेमूळे पुढील २७ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली.
भटक्या कुत्र्यांच्या समस्यांवरती उपाय शोधण्याऐवजी सत्ताधारी भाजपचे नगरसेवक व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली. यावेळी शहरातील भटक्या कुत्र्यांना आवर घालण्याची मागणी विरोधकांच्या वतीने करण्यात आली.
शहरातील भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यास प्रशासनाला अपयश आले असून ही समस्या उग्र झाली आहे. प्रशासन केवळ दिखावू कारवाई करते, त्यामुळे शहरातील मोकाट कुत्री पकडली जात नाहीत, जी पकडली जातात ती मोशी परिसरात सोडली जातात व ती परत आजूबाजूच्या परिसरात येतात.
या गोष्टीची जाणीव प्रशासनास व्हावी याकरिता आज विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी चक्क सभागृहात कुत्रे घेऊन येण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाच्या विनंतीनंतर साने यांनी हा प्रकार थांबवला. या प्रकारामुळे सभागृह काही काळ पेटले होते.
परिस्थितीचा अंदाज घेऊन महापौरांनी दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतरही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सभा तहकूब करण्याचा ठराव मांडला व महापौर राहुल जाधव यांनी सभा तहकूब करून पुढील सभा २७ तारखेस घेण्याचा निर्णय घेतला.