न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :– 206 पिंपरी विधानसभा मतदारसंघात तब्बल चार हजार 645 मतदार स्थलांतरित, दुबार, मृत असून त्या मतदारांना वगळण्याचा प्रस्ताव मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून बुधवारी महासभेसमोर आयत्यावेळी दाखल करण्यात आला होता.
मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या 10 मे 2018 च्या परिपत्रकानुसार 1 जानेवारी 2019 पर्यंतच्या छायाचित्र मतदार यादीचा ”विशेष संक्षिप्त पुनर्परीक्षण कार्यक्रम” घोषित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून पिंपरी विधानसभा मतदार संघातील 399 यादी भागातील स्थलांतरित, दुबार, मृत मतदारांची नावे वगळणी हा व्यापक प्रसिध्दीचा भाग असून प्रस्तावित वगळणी करण्यात येणाऱ्या मतदारांची यादी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आली होती.
निवडणूक अधिकाऱ्यांकडून पिंपरी विधानसभेतील मतदारांना नोटीस बजावून त्यांचे जाब-जबाब, पंचनामे यांची छाननी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून लवकरच मतदारांच्या नावाची यादी मुख्य निवडणूक आयोग, पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका या शासकीय कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.