न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली आहे. पदोन्नती झाल्यानंतर त्यांची दुसऱ्या विभागात बदली होते. मात्र, मलईदार व चांगल्या विभागासाठी त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लॉबिंग सुरू असून, त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खासदार व आमदारांकडे फिल्डींग लावली जात आहे.
महापालिकेच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांना बढतीनुसार पदे देण्यात आली आहेत. रिक्त असलेल्या विभागात त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, तीन महिने उलटले तरी अद्याप ते अधिकारी व कर्मचारी पूर्वीच्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी धडपडत आहेत.
महापालिकेत नगररचना, बांधकाम परवानगी व सामान्य प्रशासन हे महत्वाचे व मलाईदार विभाग मानले जातात. या मलईदार विभागात बदली मिळावी यासाठी अनेक कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी पालिकेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह खासदार व आमदारांकडे फेऱ्या वाढल्या आहेत.
दरम्यान, पदोन्नतीनुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांची ज्या विभागात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी बदली केली आहे. त्या आदेशात आता बदल होणार नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमलेल्या विभागात रूजू व्हावे, असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.