- स्वी. सदस्य दिनेश यादव यांची झोपडपट्टी पुनर्वसन विभागाकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२३) :- शहरातील लाभार्थ्यांना घरकुलाचा ताबा लवकर द्या, अशी मागणी स्वी. सदस्य दिनेश यादव यांनी झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या सह. उपायुक्त सुषमा शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
पत्रात यादव यांनी म्हटले आहे की, चिखली, चऱ्होली, मोशी या भागात महापालिकेने गोरगरीब लोकांसाठी घरकुल योजना राबविली आहे. परिसरात घरकुल तयार आहेत. पण, किरकोळ कामे पूर्ण झाली नसल्याने अजुनही लाभार्थ्यांना या घरांचा ताबा मिळालेला नाही. काहींनी कर्ज घेऊन घरांसाठी पैसे भरले आहेत. त्या कर्जाचे हप्ते सुरू झाले आहेत.
तसेच भाड्याच्या घरात राहत असल्याने घराचे भाडेही द्यावे लागतेय. दुप्पट भुर्दंड लाभार्थ्यांना सोसावा लागत आहेत. महापालिकेने लवकरात लवकर अपूर्ण राहीलेली कामे पूर्ण करावीत. लाभार्थ्यांना लवकर घरे ताब्यात द्यावीत, असे या पत्रात दिनेश यादव यांनी म्हटले आहे.
















