न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२३) :- देहू नगरपंचायतीच्या बांधकाम, महिला व बालकल्याण, पाणीपुरवठा आणि आरोग्य समितीच्या सभापतींची मुदत संपल्याने बुधवारी (दि. ५) देहू नगरपंचायतीच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यामध्ये बांधकाम सभापतिपदी पूनम काळोखे, आरोग्य सभापती म्हणून उपाध्यक्ष शीतल हगवणे, महिला व बालकल्याण सभापतिपदी पौर्णिमा परदेशी यांची निवड झाली. तर पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी सुधीर काळोखे यांना सलग दुसऱ्यांदा संधी देण्यात आली. दरम्यान, या समित्यांवर नाराज गटाचे वर्चस्व असल्याचे दिसून आले.
पीठासीन अधिकारी म्हणून हवेलीचे प्रांताधिकारी संजय असवले यांनी काम पाहिले, तर सहायक म्हणून मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी काम पाहिले. सकाळी ११ वाजता विषय समित्या आणि समितीच्या सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली. त्यानंतर दुपारी गट नेते योगेश परंडवाल यांनी सर्व समितींच्या सभापतींचे नामनिर्देशन अर्ज दाखल केले. यामध्ये बांधकाम सभापती म्हणून पूनम काळोखे, आरोग्य सभापती म्हणून उपाध्यक्ष शीतल हगवणे, महिला व बालकल्याण सभापती पदासाठी पौर्णिमा परदेशी व पाणीपुरवठा समितीच्या सभापती पदासाठी सुधीर काळोखे यांचे एकमेव अर्ज दाखल झाले. त्यानंतर अर्जाची छाननी करून सर्व अर्ज वैध ठरले. विषय समिती सदस्यांची देखील नावे जाहीर केली. विषय समिती सभापती पदासाठी नामनिर्देशन पत्रे आणि अर्ज पीठासीन अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आले.
दरम्यान, गेल्या निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांनी सभापतिपदाच्या उमेदवारांची नावे सर्वानुमते दिली होती. यावेळी मात्र आमदार शेळके यांनी यात लक्ष न घालता सर्व सदस्यांनी एकमताने निर्णय घेऊन ही निवडणूक पार पाडली. यामध्ये नाराज गटाचे वर्चस्व राहिल्याचे स्पष्ट दिसून आले.















