- पालिकेचे अति. आयुक्त प्रदीप जांभळे यांची उद्यानास भेट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२३) :- प्राधिकरणातील सर्वात मोठे १४ एकर भागात विस्तारलेले संत ज्ञानेश्वर उद्यानात मोठे बदल करणार असल्याची ग्वाही अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांनी प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांना उद्यानाच्या पाहणी दरम्यान दिले.
याप्रसंगी अ प्रभाग उद्यान विभागाचे अभियंता, सामाजिक कार्यकर्ते प्रसेन अष्टेकर, पर्यावरण अभ्यासक विजय मुनोत उपस्थित होते. आज पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त क्रमांक १ चे श्री जांभळे यांनी पेठ क्रमांक २८ मधील नक्षत्र वाटीकेस म्हणजेच संत ज्ञानेश्वर उद्यानास भेट देऊन पाहणी केली. उद्यान अधीक्षक व विभागीय अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सूचना दिल्या. शहरातील या जुन्या महत्वपूर्ण उद्यानाची असलेली वस्तुस्थिती सुमार असल्यामुळे त्यांनी पाहणी दरम्यान नाराजी व्यक्त केली व अधिकाऱ्यांना फ़ैलावर घेतले. जॉगिंग करणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा व्यवस्थित दोन्ही बाजूला झाडी लावणे, जमिनीवरील हिरवळ लॉन सुस्थितीत पुन्हा बनविणे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पाहणी दरम्यान प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” गेल्या तीन वर्षांपासून समिती संत ज्ञानेश्वरांच्या म्युरल करीता पाठपुरावा करीत आहे. सदरचे काम अर्धवट स्थितीत असून ते तातडीने करण्यात यावे. नक्षत्र वाटीकेतील झाडांची पुन्हा लागवड करावी. तसेच उद्यानात पोयटा माती कमी असल्याने झाडांची वाढ होत नसल्याचेही स्पष्ट केले. तसेच निगडी येथील विहिरीच्या पंपिंग स्टेशन मधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने तातडीने पाईप्स बदलण्याची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणून दिले.
याबाबत अतिरीक्त आयुक्त जांभळे यांनी लवकरच उद्यानात मोठे बदल करणार असल्याचे सूतोवाच केले. तसेच उद्यानाबाबत आपल्या सूचनांची दखल घेतली जाईल असे सांगितले. उद्यानात दरोरोज शेकडो नागरिक व्यायाम ,चालणे व जॉगिंग करण्यासाठी येत असल्याने उद्यानाचा काया पालट होणे आता गरजेचे आहे.


















