न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ मे २०२३) :- शहरी भागातील अतिशय दाटीवाटीने वसलेल्या भागापासुन तसेच झोपडपट्टी वस्तीपासून नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर जास्त असणे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कामकाजाच्या अयोग्य वेळेमुळे, काही झोपडपट्ट्या व झोपडपट्टी सदृश भाग आरोग्य सेवांपासून वंचित राहत आहेत. तसेच राज्यातील दवाखाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्ट बनवण्यासाठी, सातत्यपूर्ण आरोग्य गुणवत्तापुर्ण सेवा प्रदान करण्यासाठी, विविध रोगांच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि नियंत्रण करण्यासाठी, तसेच सुलभ आणि परवडणारी जागतिक दर्जाची दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करून संपूर्ण समाजाचा अरोग्य निर्देशांक वाढविण्याकरीता “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” च्या माध्यमातून गरजू रुग्णांना सेवा देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.
महाराष्ट्र राद्यात ५० टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास आहे. शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” ही नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रे १५ वा वित्त आयोग अंतर्गत स्थापित केली जाणार आहेत.
शहरी भागातील एकुण लोकसंख्येपैकी साधारण १२,००० ते २०,००० लोकसंख्येसाठी एक याप्रमाणे “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” स्थापन केले जातील. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” केंद्रासाठी विशेष ब्रँडिंग व लोगो (मुंबई येथील “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना”प्रमाणे) विकसित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे एकूण ३४२ पैकी ३१७ कार्यान्वित झालेल्या ठिकाणी १ मे २०२३ पासून कार्यान्वित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सदर प्रकल्पाची लोकोपयोगीता लक्षात घेऊन सदर केंद्रांच्या संख्येत वाढ करुन त्यात विनामूल्य वैद्यकीय चाचण्या, चिकित्सा व उपचार करण्यात येतील.
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” मध्ये बाह्यरुग्ण सेवा (वेळ दुपारी २.०० ते रात्री १०.००), मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, टेलीकन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, तसेच या केंद्रामध्ये या सेवांच्या व्यतिरिक्त महिन्यातुन निश्चित दिवसी नेत्रतपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे (M/S. HLL) रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा उपलब्ध करुन देण्यात येतील.
” हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” केंद्रातून रुग्णांना गरजेनुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातुन बाह्यरुग्ण विभागातील
भिषक (फिजीशियन), स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, कान नाक घसा तज्ञ सेवा ह्या सायंकाळी ५.०० ते ९.०० वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येतील. जेणेकरुन झोपडपट्टी भागातील मजुर कामावरुन परत आल्यानंतर या सेवांचा लाभ घेतील. आवश्यकतेनुसार अतिरिक्त सेवा सदर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” मध्ये वाढविण्यात येतील. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, बहुउद्देशिय कर्मचारी, अटेंडंट / गार्ड आणि सफाई कर्मचारी या मनुष्यबळाचा समावेश असणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत राज्यात “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” (नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र) च्या डिजीटल अनावरण सोहळ्याबाबत दि. ०१.०५.२०२३ रोजी मुंबई येथे संपन्न झाला आहे. हा डिजीटल अनावरण सोहळा एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते व देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व डॉ. प्रा. तानाजी सावंत, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” (नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र) जाधववाडी दवाखाना या दवाखान्याचे सदर सोहळ्यांतर्गत अनावरण करण्यात आले. यावेळी आयुक्त शेखर सिंह, लोकप्रतिनिधी राहूल जाधव (माजी महापौर), अश्विनी जाधव (माजी नगरसदस्या), अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उप आयुक्त आण्णासाहेब बोदडे, सहा. आयुक्त-उद्यान विभाग रवि घोडके, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवनकुमार साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल साळुंखे, डॉ. विकास बोरकर, डॉ. वैशाली पाटील, डॉ. अपूर्वा नाटलावार, डॉ. धनंजय जाधव, पी.एच.एन.(कुटुंब कल्याण विभाग) लता जगताप, शाहीन शेख, आरोग्य सेवक मनोज पाटील, संदीप जगताप, आरोग्यसेविका मंदा लोखंडे, सिमा नाखले, आरती मोडशे, शामल मोहिते, आशा कार्यकर्ती आशा आहेर, कविता सोळंके, आरती तागडे, सिमा सुर्यवंशी, अश्विनी ढोकळ, शितल आखाडे, मदतनीस गोविंद वाळुंजकर, सचिन स्वामी आदी उपस्थित होते.












