न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२३) :- देहू ते देहूरोड पालखी मार्गावरील शाळा आणि चौकातील गतिरोधक वगळता अन्य वाहतुकीस अडथळा ठरत असलेले ३७ गतिरोधक ताबडतोब काढून टाका, असा आदेश हवेलीचे प्रांताधिकारी संजय असवले यांनी दिला. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १३ कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे, त्यातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवा, अशी सूचनाही त्यांनी पोलिस व नगरपंचायत प्रशासनाला केली.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० जून रोजी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर देहूतील संत तुकाराम महाराज देऊळवाड्यात आढावा बैठक झाली. दरम्यान, देहू ते निगडीपर्यंतच्या मार्गाची असवले यांनी पाहणी केली. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तममहाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख संजयमहाराज मोरे, अजितमहाराज मोरे, अप्पर तहसीलदार डॅा. अर्चना निकम आदी उपस्थित होते.
नगरपंचायतीने देहू ते देहूरोड मार्गावर ३७ गतिरोधक उभारले आहेत. अरुंद रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे, यावर बैठकीत चर्चा झाली. गतिरोधकांमुळे पालखी रथाला अडचणी येतील, याकडे संजयमहाराज मोरे यांनी लक्ष वेधले. त्यावर असवले यांनी तत्काळ गतिरोधक काढण्याचा आदेश दिला. तसेच आरोग्य, वीज, पाणीपुरवठा विभागाला सुविधांबाबत सूचना दिल्या. देहू ते पुणे या मार्गावर वारकऱ्यांची स्वच्छतागृहांअभावी गैरसोय होऊ नये, यासाठी फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कळविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या व औषधांचा साठा वाढवणार, पाणी वाटपासाठी जादा टॅंकर देणार, चोवीस तास पिण्याचे पाणी असणार, एक हजार फिरते शौचालय असणार, पालखी मार्गावरील खड्डे बुजवा, सीसीटिव्ही कॅमेरे बसवा, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.


















