न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२३) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या लिफ्टमध्ये दिव्यांग व्यक्तीसह, सात ते आठ जण अडकल्याची घटना समोर आली. त्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न लिफ्टमन आणि इतर व्यक्ती करत होते.
अखेर, अर्ध्या तासानंतर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. याअगोदरदेखील अनेकदा लिफ्टमध्ये नागरिकांसह महापौर, पालिका अधिकारी अडकल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परंतु, नव्या कोऱ्या लिफ्टमध्ये अशी घटना घडल्याने पालिकेच्या कारभारावर टीकेची झोड उठली आहे.
दुपारी साडेबाराच्या सुमारास महानगरपालिकेच्या लिफ्टमध्ये सात ते आठ जण अडकल्याची घटना घडली. पालिका कर्मचारी, नागरिकांसह एका दिव्यांग व्यक्तीचा यात समावेश होता. नवी कोरी असलेली लिफ्ट अचानक बंद पडल्याने आतील नागरिक घाबरले होते. काहींना श्वास घेण्यास त्रास झाल्याचेदेखील सांगण्यात येत आहे. लिफ्ट बंद पडल्याने लिफ्टमनसह इतरांची इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर चांगलीच धावपळ झाली. अखेर अर्ध्या तासाने लिफ्टमधून सात ते आठ जणांना बाहेर काढण्यात यश आले.
















