न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२३) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जलतरण तलावांना ऑनलाईन अकाउंटसाठी आधार नंबर सक्ती नाही; परंतु तिकीट बुक करताना तसेच तलावावर येण्यासाठी आधार नंबर / झेरॉक्स देण्याची असलेली सक्ती आता काढून टाकण्यात आलेली आहे. सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे यांनी त्यासाठी आयुक्तांकडे तसेच क्रीडा विभागाकडे पाठपुरावा केला होता.
याबाबत सचिन गोडांबे यांनी पालिकेला मागील महिन्यात तीनदा ई-मेल द्वारे आधार सक्ती काढून टाकण्याबाबत मागणी केलेली होती. अशी सक्ती ही बेकायदेशीर व सुप्रीम कोर्टाच्या आधार बाबतीतील २०१३ पासूनच्या अनेक आदेशांचे उल्लंघन आहे. पालिकेच्या तिकीट बुकिंग साईटवरील मजकूर तातडीने बदलण्यात यावा व त्यातून संविधान विरोधी आधार सक्तीचा उल्लेख काढून टाकण्यात यावा, अशी मागणी सचिन गोडांबे यांनी केली होती.
केंद्र सरकारने आधार कार्ड बाबत महत्त्वाचे आदेश काढले आहेत. या नव्या सुचनेनुसार आधार कार्डची झेरॉक्स कुठेही जमा न करण्यास सरकारने म्हटले आहे. आधार कार्डचा होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी सरकारने हे आदेश काढले आहेत. एखाद्या ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स अत्यावश्यक असल्यास आधारकार्डची मास्क असलेली झेरॉक्स द्यावी, अशी सूचना सरकारने केली आहे. तुमच्या आधार कार्डची फोटोकॉपी एखाद्या व्यक्तीला अथवा संस्थेला देऊ नये. ज्या संस्थांनी UIDAI कडून परवाना घेतला आहे, त्याच संस्था, आस्थापनाने एखाद्या व्यक्तिची माहिती घेण्यासाठी आधार कार्डचा वापर करू शकता. केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार, हॉटेल, सिनेमागृह अथवा इतर सरकारी किंवा खासगी संस्थांना ग्राहकांकडून, व्यक्तींकडून आधार कार्डची प्रत जमा करून घेण्याचा अधिकार नाही, असे सचिन गोडांबे यांनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिले.
यावर पालिकेच्या क्रीडा विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सचिन गोडांबे यांना पत्र पाठवून सदर आधार सक्ती काढून टाकण्यात येत आहे. फोटो असलेले कोणतेही ओळखपत्र तिकीट बुकिंग तसेच जलतरण तलावावर दाखवले तरी चालेल असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.


















