- कंपनीतील कामगारांना पोलिसांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२३) :- पिंपरी चिंचवड परिसरातील दुचाकी चोरीवर आळा घालण्याकरिता गुन्हयांचे क्राईम मॅपिंग करुन, नाकाबंदी व पेट्रोलिंग करुन गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार विविध ठिकाणी अचानक नाकाबंदी व पेट्रोलिंग कारवाई सुरु होती.
दरम्यान (दि. २१) रोजी पोलिसांनी इंडोरंन्स चौक येथे नाकाबंदी लावली होती. नाकाबंदी दरम्यान एकजण आला. त्याला पोलिसांनी हाताने थांबण्याचा इशारा केला. तो न थांबता पळुन जावुन लागला. त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यात असलेली हिरो कंपनीची स्प्लेंडरबाबत विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरची गाडी ही (दि. १७) रोजी महींद्र कंपनी गेट नं २ च्या बाहेरील मोकळ्या जागेतुन निघोजे, ता. खेड जि.पुणे येथुन चोरली असल्याचे सांगितले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २६८ / २०२३ भा.द.वि.क. ३७९ अन्वये अज्ञात चोरटयाविरुध्द गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांना समजले.
चंद्रकांत ऊर्फ बाळु हरिचंद्र घोलप (वय ३६ वर्षे, रा. मुळगाव चिंचवडगाव, ता. वडवणी जि. बीड; सध्याचा पत्ता इंद्रायणी घाट परिसर, आळंदी, ता. खेड जि. पुणे) असे आरोपीचे नाव असून त्याला गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आरोपीस न्यायालयाने पोलीस कस्टडी दिली आहे. पोलीस कस्टडी दरम्यान त्याच्याकडे अधीक तपास केला असता त्याच्याकडुन ३,१०,००० रुपये किंमतीच्या ०७ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त विवेक पाटिल, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वसंतराव बाबर, पोउपनि विलास गोसावी, पोहवा अमोल बोराटे, अशोक जायभाये, युवराज बिराजदार, पोना संतोष काळे, विठ्ठल वडेकर, किशोर सांगळे, मपोना जमदाडे, पोकॉ/ शिवाजी लोखंडे, राजेंद्र खेडकर, बाळकृष्ण पाटोळे, आमोल माटे, गणेश गायकवाड, संतोष वायकर, राहुल मिसाळ, शरद खैरे, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी केली आहे. पुढील तपास पो.हवा.ब.नं.४८६ अशोक जायभाये, महाळुंगे पोलीस चौकी हे करीत आहेत.
कंपनीतील कामगारांना आवाहन…
एमआयडीसी हद्दीतील कंपन्यामधील कामगारांना आवाहन करण्यात येते की, सर्वजन मोटारसायकल वापरत असताना हेलमेटचा वापर करावा. तसेच कामगारांनी आपल्या मोटार सायकली कंपनीच्या आवारात कंपाऊंडच्या आत सिक्युरिटी / सीसीटीव्ही निगराणीखाली लावण्यात याव्यात. तसेच मोटार सायकलीला मेटल टायर लॉक लावावे व हॅन्डल लॉक करून पार्क कराव्यात. जेणेकरुन कंपनी आवारामधुन होणा-या चोरीस प्रतिबंध निर्माण होईल.