न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२३) :- नोकरीसाठी परराज्यातून आलेल्या तरुणीचा विनयभंग केला. या प्रकरणी शिक्षण मंडळाचे माजी सभापती अर्जुन ठाकरे यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पिंपरी आणि लष्कर पोलिस ठाण्याच्या हद्दीत १५ मे ते ४ जून २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.
पश्चिम बंगाल येथील पीडित २८ वर्षीय तरुणीने बुधवारी (दि. १४) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, महेश्वरी रेड्डी, चिरागउद्दीन शेख, महिला आरोपी (तिघेही रा. कोंढवा, पुणे) आणि अर्जुन ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कामाच्या शोधात होती. तिला वेबसाइटवरून एका महिलेचा नंबर मिळाला. महिलेने तरुणीला बँकेत नोकरीसाठी इंटरव्ह्यू असल्याचे सांगून पुण्यात येण्यास सांगितले. त्यानंतर बँकेत नोकरीसाठी वेळ लागणार असल्याचे सांगून इतर नोकरीसाठी अर्जुन ठाकरे यांच्याशी संपर्क करण्यास सांगितले. त्यानंतर ठाकरे याने चिरागउद्दीन शेख, महिला आरोपी आणि महेश्वरी रेड्डी यांच्याशी पीडित तरुणीची ओळख करून दिली. दरम्यान, १५ मे रोजी तरुणीला आरोपींनी पुण्यातील कार्यालयात बोलविले. तेथे ठाकरे याने तिचा विनयभंग केला.