- भाजपा आमदार अश्विनीताई जगताप यांच्या पाठपुराव्याला यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२३) :- स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रभर राबविलेल्या औद्योगिक आणि सहकार धोरणामुळे पिंपरी चिंचवड, मुंबई, पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रभर उद्योगधंदे सुरू होऊन अल्पावधीतच महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक राज्य म्हणून नावरूपास आले. कुशल हातांना रोजगार मिळाला. छोट्या-मोठ्या उद्योग धंद्यांना चालना मिळाली. याच कार्याची स्फूर्ती भावी पिढीतील युवकांना मिळावी म्हणून यशवंतराव चव्हाण स्मारक समितीमार्फत उद्योग नगरीतील निगडी प्राधिकरणातील ४४ गुंठ्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे अद्यावत स्मारक करण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांचा पूर्णकृती पुतळा, गोरगरीब मुलांसाठी वसतिगृह, विद्यार्थी मार्गदर्शन केंद्र, वधु वर सुचक केंद्र, नोकरी विषयक मार्गदर्शन केंद्र, सुसज्ज ग्रंथालय इत्यादी सुविधांसह आराखडा मंजूर करून चार मजल्यापर्यंतचे इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, संपूर्ण इमारत बांधण्याचा खर्च अंदाजे रुपये १५ कोटी आहे.
या स्मारकासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पाच कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. परंतु, स्मारकाचे काम पूर्ण न होऊ शकल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्मारकासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निधीतून पाच कोटी रुपये अनुदान देण्याची आग्रही मागणी चिंचवड मतदारसंघातील विधानसभेच्या प्रथम महिला आमदार श्रीमतीअश्विनीताई लक्ष्मण जगताप यांनी केली होती.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेरगाव येथे शुक्रवारी आयोजित ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती व कार्याची माहिती भावी पिढीला व्हावी या शुद्ध हेतूने पिंपरी चिंचवड शहरातील निगडी प्राधिकरण येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मारक समितीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या स्मारकाला पाच कोटी रुपये अनुदान देण्याचे तात्काळ जाहीर करून समितीच्या कार्याचे कौतुक केले.















