न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२३) :- एमआयडीसी भागातील डीपी रोडवरील ९२ लहान-मोठ्या व्यावसायिकांचे रोडच्या कामामुळे स्थलांतर होणार आहे. अशा व्यावसायिकांसाठी एक महिन्यापूर्वी बैठक झाली. या बैठकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे व्यावसायिकांना चऱ्होली गावात १० एकर जागा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी (दि. २२) पत्रकार परिषदेत सांगितले.
विकास आराखड्यामध्ये रोड गेल्याने एमआयडीसी भागातील ९२ व्यावसायिकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे व्यावसायिक अनेक बेरोजगारांना रोजगार देत आहेत. त्यामुळे त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. त्यांच्यासाठी च-होली परिसरात १० एकर जागा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या व्यावसायिकांना उद्यापासूनही व्यवसाय स्थलांतर करता येऊ शकतो. व्यावसायिकांना किती जागा द्यायची हे असोसिएशन ठरविणार आहे. त्यानुसार जागा ताब्यात देण्याचा बोर्डाचा ठराव चार दिवसात होईल. ठरावासाठी व्यावसायिकांना थांबण्याची आवश्यकता नसल्याचेही उद्योग मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एमआयडीसी भागासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची उद्योजकांची वारंवार मागणी होते. त्यानुसार एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलीस ठाणे बांधून देण्यात येणार असल्याचेही मंत्री सामंत यांनी सांगितले.