न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०२३) :- मान्सूनच्या पहिल्याच पावसात कुदळवाडी, जाधववाडी, मोरे वस्ती, चिखली गावठाण परिसरातील रस्त्यावर पाणी साचले असून अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. चिखली परिसरात रविवारपासून पाऊस पडत आहे. रस्त्यावर खड्डे आणि पाणी वाहून जाण्यास उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्यामुळे पहिल्याच पावसात सखल भागात पाणी साचले आहे.
मोरे वस्ती परिसरातील अनेक अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडून पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहे. कुदळवाडी परिसरात तर अंतर्गत रस्ते तसेच सेक्टर १६ ते कुदळवाडी आणि मोईकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची चाळण झाली आहे.
या रस्त्यावरून जड वाहनांची वाहतूक केली जात आहे. कुदळवाडी परिसरातील अनेक रस्त्यांच्या खाली मातीचा भरावा करण्यात आलेला आहे. त्यामुळे जड वाहने जाताना रस्ता खचून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.












