- दस्त नोंदणीतील अडचणी सोडवा; वकिलांची निबंधक कार्यालयाकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२३) :- पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने शहरातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात सोमवारी (दि. १४) काम बंद आंदोलन करण्यात आले. दस्त नोंदणीतील अडचणी सोडविण्याच्या तसेच अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
या वेळी पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. जयश्री कुटे, सचिव अॅड. गणेश शिंदे, सहसचिव अॅड. मंगेश नढे, खजिनदार अॅड. विश्वेश्वर काळजे, सदस्य अॅड. स्वप्नील वाळुंज, अॅड. नितीन पवार, अॅड. पवन गायकवाड, अॅड. सौरभ जगताप, अॅड. अल्पना रायते, अॅड. सुषमा बोरसे, अॅड. चित्रा फुगे, अॅड. काजल वायकर, अॅड. सविता अवघडे, माजी अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर, माजी अध्यक्ष विलास कुटे, माजी अध्यक्ष सचिन थोपटे, माजी उपाध्यक्ष अॅड. कालिदास इंगळे, अॅड. भाऊसाहेब शिंदे, अॅड. विनय दुगड, अॅड. गणेश सावंत आदींसह पिंपरी- चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज सुमारे ५०-६० दस्त नोंदणीसाठी सादर केले जातात. मात्र, दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व्हर वारंवार बंद पडण्याची तक्रार असते. या बरोबरच हे सर्व्हर संथ गतीने काम करत असते. त्यामुळे दस्त नोंदणी करताना विलंब होत आहे. अनेकदा दस्त नोंदणीच होत नाही. याचा पक्षकार आणि वकील यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. दुय्यम निबंधक कार्यालयातील अडचणींमुळे पक्षकार आणि वकिलांच्या वेळेसह त्यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे या कार्यालयातील सर्व्हर अत्याधुनिक करावा, अशी मागणी सातत्याने वकिलांकडून होत आहे. या प्रमुख मागणीसाठी पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने सोमवारी एक दिवसीय काम बंद आंदोलन केले.
बार असोसिएशनने निगडी, चिंचवड, भोसरी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात निवेदन देखील दिले. यामध्ये नमूद केले की, नोंदणी कार्यालयात नोंदणी अधिकारी आणि कार्यालयातील कर्मचारी यांनी वकिलांसोबत उद्धटपणे व मानहानीकारक बोलणे थांबवले पाहिजे. दस्त नोंदणी कार्यालयातील ऑपरेटरचा मनमानी कारभार थांबला पाहिजे. महिला व कनिष्ठ वकिलांची अडवणूक थांबवून महिलांना योग्य वर्तणूक दिली पाहिजे. नोंदणी कार्यालयात पिण्याचे पाणी, स्वच्छ स्वच्छतागृह, महिलांसाठी प्रतीक्षा कक्ष आदी सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच सकाळी पावणे दहा वाजता दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरू करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.














