- पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केली चिंता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२३) :- पोलीस अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कठीण गुन्हे उघडकीस आणत आहेत. पुण्यात आंतकवाद्यांची मोठी लिंक सापडली. या लिंकमुळे आपल्याला हादरा बसेल. त्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत आहेत. ते कुठे-कुठे चालले आहेत, हे मी जाहीरपणे बोलू शकत नाही. पोलिसांवर उलट गोळीबार झाला. त्यात दोघे पकडले. एकजण पळाला. परत त्याला पकडले. अशा गोष्टी पोलीस विभागात होत असतात, असे मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास उपस्थित राहून पोलीस आयुक्तांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.
पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यावर विशेष भर दिल्यामुळेच आज अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल होत आहे. तसेच वाढत्या गुन्हेगारीवर चाप बसत आहे. आता पोलिसांनी अमली पदर्थांची तस्करी करणाऱ्यांवरही चाप बसविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. मारामारी झाली. चोरांना पकडले हे चालत राहील. परंतु, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात ड्रग्जचे प्रमाण भयंकर वाढत चालले आहे. ड्रग्जवाले तरुण मुला, मुलींना अक्षरशः खात आहेत. त्यामुळे ड्रग्जवाल्यांवर कडक कारवाई करावी. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखले पाहिजेत. दामिनी पथक अतिशय सक्षम आहे. पथकाला अधिकार; तसेच दुचाकी, चारचाकी वाहने द्यावीत. या गोष्टींवर लक्ष द्यावे, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी पोलीस आयुक्तांना केली.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांच्या सोयी सुविधांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. जिल्हा नियोजन समितीतून ४० कोटी दिले आहेत. लोक सहभागातून ६० कोटी रुपये मिळवून देणार आहे. पुणे शहरात १०० पोलीस चौक्या आहेत. त्यांची अवस्था बिकट आहे. पंखे खडखड करत असतात. पुणे पोलिसांनी चोरीचा हस्तगत केलेला सात कोटींचा मुद्देमाल न्यायालयातून सोडवून नागरिकांना परत केला. पोलिसांना सहकार्य केले पाहिजे, असेही ते म्हणाले.















