शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या..
भाजपचे दीपक मोढवे पाटील यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 24 ऑगस्ट 2023) :- पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याबाबत महापालिका प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात. अशुद्ध पाण्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, याबाबत गांभीर्याने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजय खोराटे आणि उल्हास जगताप यांना निवेदन पाठवले आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना गढूळ, अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. चिखली, डुडुळगाव, मोशी, जाधववाडी, आदींसह शहरातील विविध ठिकाणी ही समस्या जाणवत आहे. याबाबत नागरिक सातत्याने तक्रारी करत आहेत. मात्र त्यांच्या तक्रारींना महापालिका कर्मचारी सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत. या बरोबरच शहरातील अनेक भागात रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडले जात आहे. त्यामुळे नदी प्रदूषणात भर पडत आहे. नदीतील पाणी फेसाळलेले दिसत आहे. जलचर देखील मोठ्या प्रमाणात मृत्युमूखी पडत आहेत. या बरोबरच शहरातील मैलामिश्रित पाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये घुसून नागरिकांना अशुद्ध पाणी मिळत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
परिणामी, नागरिकांचे आरोग्य सदृढ करण्यासाठी यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. रासायनिक कंपन्या नदीत सांडपाणी सोडत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. त्याबाबत योग्य त्या कार्यवाहीच्या सूचना द्याव्यात. शहरातील पिण्याच्या पाईपलाईनजवळून मैलामिश्रित पाणी जाणार नाही. यासाठी स्वतंत्र पाईपलाइनची सुविधा द्यावी, अशी मागणी दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.
पाणी समस्येमुळे नागरिक त्रस्त…
सारथी हेल्पलाईनवर पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी मांडूनही नागरिकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे हेल्पलाइनचा खेळ करण्याऐवजी प्रत्यक्ष यंत्रणा सक्षम करून नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर जनसंवाद सभा आयोजित केल्या जात आहेत. या मध्ये नागरिक आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडत आहेत. यंदा बहुतांश भागातून पाण्याबाबत तक्रारी आलेल्या आहेत. अनेक भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे नोकरदारांची, गृहणीची गैरसोय होत आहे. अनेक सोसायटीधारकांना खिशातील पैसे खर्च करून पाण्याचा टँकर मागविण्याची वेळ येत आहे. यामुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे ज्या भागात कमी दाबाने पुरवठा होत आहे, तिथे देखील योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.












