न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२३) :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहरामध्ये आले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं.
पुष्पांची उधळण आणि सोलापूरवरून मागवण्यात आलेला भला मोठा साडेपाचशे किलोच्या पुष्पहाराने रावेत मुकाई चौकात अजित पवार यांचं स्वागत करण्यात आलं.
शहरातील मुकाई चौक रावेत येथे अजित पवार येताच फटाक्यांच्या आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात मोठं स्वागत झालं. त्यानंतर सुरु झालेल्या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे बुलेटच्या ताफ्यासह सहभागी झाले होते.
बुलेटच्या सायलन्सरमधून कर्कश्य, फाडफाड आवाज काढत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडत वाहतूक नियमांचा आणि ध्वनीबाबत असलेल्या नियमांचा भंगही केला. हा सर्व प्रकार पोलिस अधिकाऱ्यांच्या समोरच सुरु होता. तेव्हा अशा या उत्साही कार्यकर्त्यांवर पोलीस कारवाई करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.












