न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- चिंचवडमधील ऑटो क्लस्टर येथे ‘गणेशोत्सव स्पर्धा २०१७’ विजेत्या गणेश मंडळांचा बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. बक्षीस वितरणाची परंपरा खंडित होऊ नये याकरिता विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आंदोलनाचा पवित्र हाती घेतला होता. वेळीच महापौर राहुल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांनी पुढाकार घेऊन स्वनिधीतून विजेत्या गणेशोत्सव मंडळांना बक्षीसे देण्याचा निर्णय घेतला होता.
बक्षीस वितरण समारंभास पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नम्रता लोंढे नगरसदस्य उत्तम केंदळे, स्वीकृत सदस्य सागर हिंगणे, दिनेश यादव तसेच परीक्षण समितीचे सदस्य नंदकुमार सातुर्डेकर, श्रावण जाधव व पुरुषोत्तम शेलार आदी उपस्थित होते.
न्यायालयीन आदेशामुळे महापालिकेस बक्षीस वितरण करण्यास अडचण येत असल्याचे भाजपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते. परंतु बक्षीस वितरण समारंभ होत नसल्यामुळे गणेश मंडळांमध्ये भाजपविरोधात असंतोष निर्माण झाला होता. महापौर व सत्तारूढ पक्षनेते या दोघांच्या समन्वयामुळे महापालिकेची बक्षीस वितरणाची परंपरा खंडित होण्यापासून वाचली. बक्षीस वितरण समारंभ झाल्यामुळे गणेश मंडळांनी समाधान व्यक्त केले आहे.