- गणेशोत्सवात गणेश मंडळांना आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ सप्टेंबर २०२३) :- नागरिकांच्या सार्वजनिक सुरक्षिततेकरीता महानगरपालिकेमार्फत पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील इमारती,सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर प्रकाश व्यवस्थेकरीता दिवाबत्तीची यंत्रणा उभारणेत आलेली आहे.
सदर दिवाबत्ती प्रकाश व्यवस्थेची देखभाल दुरुस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत आवश्यकतेनुसार करण्यात येते. महानगरपालिकेच्या सर्व विद्युत अभियंत्यामार्फत पिंपरी चिंचवडकरांच्या सुरक्षिततेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व स्ट्रिट लाईट पोलची तपासणी करण्यात आली आहे. तसेच धोकादायक परिस्थितीमध्ये एकही पोल आढळुन येणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे.
या कामांमध्ये काही उणीवा/त्रुटी अथवा कोणतेही असुरक्षिततासदृश्य परिस्थिती आढळल्यास म्हणजेच पोलला शॉक लागणे, गंजलेला व धोकादायक पोल, तुटलेला जंक्शन बॉक्स, फिडर पिलर आढळल्यास खालील संपर्क दुरध्वनीवर तक्रार नोंदविण्यात यावी.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका :- फोन नं- ६७३३३३३३
सारथी हेल्पलाईन.-८८८८००६६६६
सारथी ऑनलाईन तक्रार नोंदणी[email protected]
दिनांक १९/०९/२०२३ ते २८/०९/२०२३ दरम्यान श्रीगणेशोत्सव सण साजरा करण्यात येत आहे. हा सण साजरा करताना सर्व श्रीगणेश मंडळांनी व नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पिंपरी-चिंचवड मनपाच्या पथदिव्यांच्या खांबाचा आधार न घेता पथदिव्यांचा पोल व मांडव यामध्ये सुरक्षित अंतर ठेवून श्रीगणेशोत्सव मंडळाची उभारणी करण्यात यावी. तसेच श्रीगणेशोत्सवासाठी वीजजोडणी पिंपरी-चिंचवड मनपाच्या पथदिव्यांच्या खांबावरील जंक्शन बॉक्स अथवा फिडर पिलरमधून घेऊ नये.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने श्री गणेशोत्सवासाठी तात्पुरती वीज जोडणी अगदी अल्प दरात व अल्पकाळात देण्याची व्यवस्था केलेली आहे.तरी सर्व श्रीगणेशमंडळांनी याचा लाभ घेऊन अनधिकृत वीज जोडणी टाळावी तसेच विद्युत सुरक्षा पाळून जीवितहानी टाळा.तरी सर्व श्री गणेश मंडळांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेस सहकार्य करून व अधिकृत वीज जोडणी घेऊन श्रीगणेशोत्सव आनंदात साजरा करावा. त्याचप्रमाणे इमारती व दिवाबत्तीचे खांबामधुन मनपाकडुन प्रकाशव्यवस्थेकरीता थ्री फेज ४४० व्होल्टचा वीजपुरवठा केलेला असतो.तरी नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खालील बाबींचे कटाक्षाने पालन करावे.-
नागरिकांनी पथदिवे खांब व विद्युत य़ंत्रणेशी कोणत्याही प्रकारची छेडछाड करु नये.
खांबाला व फिडर पिलरला स्पर्श करु नये.
पथदिवे खांबातुन विनापरवाना वीज घेऊ नये.
जनावरे खांबांना बांधु नयेत.
जंक्शन बॉक्सवर पाय ठेवुन खांबावर चढु नये.
कपडे वाळत घालण्यासाठी खाबांना तारा बांधु नये.
बांधकामामध्ये पथदिव्यांचे खांब घेऊ नये.खांबांना फ्लेक्स ,होर्डिंग्ज बांधु नये.
कोणत्याही प्रकारची केबल/तार खांबावरुन ओढु नये.
वरील निर्देशित प्रकारच्या कृत्यामुळे संबंधित नागरिकांचे जिवितास धोका उत्पन्न होण्याची किंवा जिवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.अश्या प्रकारच्या कृत्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवित अथवा वित्त हानी झाल्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिका अश्या दुर्दैवी घटनेस जबाबदार रहाणार नाही याची सर्व संबंधित नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी असे आवाहन विद्युत विभागाचे सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले यांनी केले आहे.