न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२३) :-पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्रास दुपारी चिंचवड येथील झोपडपट्टी पुनर्वसन इमारत येथील रूमला आग लागली आहे अशी वर्दी मिळाली. सदर वर्दी प्राप्त होताच मुख्य अग्निशमन केंद्राच्या तीन अग्निशमन वाहनाबरोबर प्राधिकरण ,थेरगाव, रहाटणी या उपग्निशमन केंद्राचे प्रत्येकी एक अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
वेताळनगर पुनर्वसनातील इमारत क्रमांक ०५ च्या पहिल्या मजल्यावर असलेल्या १०९ क्रमांकाच्या खोलीमध्ये चिंध्या, कापड व्यवसाय करणारे अशोक तेलंग यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात कपडे चिंध्या असल्याने सदरच्या कपड्याने आग पकडून इमारतीच्या पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर धुराचे लोट
पसरल्या गेले, अग्निशमन दलाच्या जवानाकडून इमारतीतील लोकांना सुरक्षित करण्यात आले, इमारतीमधील सर्व रहिवाशांना तळमजल्यावर सुखरूप उभे करण्यात आले, एका बाजूने बचाव कार्य करीत असतानाच दूस-या बाजूने अग्निशमन कार्य चालू होते. अथक प्रयत्नांनंतर आग विझवण्यात आली.
सदर घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही वा व्यक्ती जखमी झाली नाही. सर्व नागरिक सुखरूप असल्याची खात्री अग्निशमन दलाकडून करण्यात आली आहे.घटनास्थळी अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे,चिःचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णराव खराडे उपस्थित होते.
सदर आगीमध्ये घरात असलेले चिंद्या, कपडे, फर्निचर, फ्रिज यांचे नुकसान झाले असून आगीचे स्पष्ट कारण समजू शकले नाही. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या ०४ अग्निशमन केंद्रातील एकूण ३० हून अधिक जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी व जिवितहानी टाळण्यासाठी अथक प्रयत्न केले. वर्दीवर हजर अग्निशमन केंद्रातील वाहने:- प्राधिकरण ०१ वॉटर टेंडर वाहन, थेरगाव ०१ वॉटर टेंडर वाहन, पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र ०१ वॉटर टेंडर, ०१ हायड्रोलिक प्लॅटफॉर्म लेडर वाहन, ०१ देवदूत अग्निशमन वाहन, रहाटणी ०१ वॉटर टेंडर वाहन.















