- मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची महापालिका प्रशासनाकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 11 सप्टेंबर 2023) :- पिंपरी-चिंचवड शहरात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. शहरातील स्मार्ट सिटी पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरातील गणेशभक्त गजाननाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने परिसरातील पवना नदीकाठच्या विसर्जन घाटाची साफसफाई आणि स्वच्छता तसेच विविध सोयीसुविधा पुरवाव्यात. तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना लवकरात लवकर कराव्यात, अशी मागणी मा. नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी महापालिका आयुक्तांकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात शत्रुघ्न (बापू) काटे यांनी म्हटले आहे कि, पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरात गणेशोत्सवाच्या आगमनासाठी गणेशभक्त तयारीला लागले आहेत. एक, दिड, दहा आणि अकरा दिवसांच्या गणेशाचे घरोघरी आगमण होते. विसर्जनाच्या दिवशी परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळे , बैठी घरे आणि सोसायटीतील गणेशभक्त मोठ्या संख्येने या घाटांवर गणपती विसर्जनासाठी एकत्र येतात. दरम्यान विसर्जन घाटावर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी उपाययोजना कराव्यात.
घाटावर गणेशमूर्ती पूजन आणि आरतीसाठी व्यवस्था असावी. सुरक्षिततेच्या दृष्टीने निगराणीसाठी CCTV कॅमेरे, दिवाबत्तीची सोय, गणेश मूर्ती विसर्जनासाठी कुत्रीम हौदाची रंगरंगोटी आणि स्वच्छता तसेच अत्यावश्यक सेवेसाठी २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध करावी. बचाव पथकही तैनात करावीत. जेणेकरून परिसरात गणेशोत्सव निर्भीड आणि मंगलमय वातावरणात पार पडेल, असे या निवेदनात शत्रुघ्न काटे यांनी म्हटले आहे.