- ‘इको फ्रेंडली गणेशा’ या मोफत कार्यशाळेत मुलांनी गिरविले गणेशमूर्ती बनविण्याचे धडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ सप्टेंबर २०२३) :- आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील लहान मुलांसाठी पिंपळे सौदागर येथे ‘उन्न ‘ती’ चा गणपती महोत्सव २०२३’ अंतर्गत ‘इको फ्रेंडली गणेशा’ या मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उन्नती सोशल फाउंडेशनच्या कार्यालयात अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे यांच्या वतीने हा महोत्सव भरविण्यात आला होता.
या कार्यशाळेस मुलांसह थोरमोठ्यांनी हिरारीने सहभाग घेत शाडूच्या मूर्तीपासून पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनविण्याचे धडे गिरविले. सकाळी दहा वाजता या उपक्रमास सुरुवात झाली होती. शाडूची माती आणि इतर साहित्य मुलांना देण्यात आले. अजित सरांनी मुर्तीचे मुख, हात, डोळे आणि इतर अवयव कसे बनवावे, रंगरंगोटी कशी करावी, मातीपासून गोळा कसा बनवाव याचे मोफत प्रात्यक्षिक मुलांना दिले. या कार्यशाळेत जवळपास दोनशे मुलांनी सहभाग घेतला. सहभागी प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच आकर्षक गणेश मूर्ती बनविणाऱ्या मुलांना बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ . कुंदाताई भिसे यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या, विद्यार्थ्यांना कलेचे ज्ञान मिळावे, विद्यार्थ्यांनी कला शिकावी, आत्मनिर्भर व्हावे. नदी व पाण्याचे प्रदूषण न होता पर्यावरणाचे संवर्धन व्हावे. गणेश मूर्तीचे पावित्र्य राहावे. नागरिकांना एक कला अवगत व्हावी, या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन केले होते. गणेशोत्सवात बाजारात रासायनिक रंग, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती येतात. त्यामुळे प्रदूषण वाढते म्हणून शाडू मातीच्या मूर्ती असाव्यात. मागील १५ वर्षांपासून मुलांसाठी दरवर्षी मोफत मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेत आहे. त्यामुळे मुलांच्या कला गुणांना वाव मिळतो आणि एक हजार मुले झटतात तेंव्हा एक कलाकार तयार होतो.
या कार्यशाळेचे संचालनअजित सरांनी तर आभार संजयशेठ भिसे यांनी मानले.