- मुर्ती दान घेणाऱ्या संस्थांवर पालिकेने ठेवावे लक्ष..
- शिवसेनेचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांची महापालिकेकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२३) :- ‘ना नफा ना तोटा तत्वावर’, ‘किंमत तुमची मुर्ती आमची’ अशा स्वरुपात गणेश मुर्ती उपलब्ध करुन देण्याचे प्रकार गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरु आहेत. दान घेतलेल्या मुर्ती पुन्हा पुढील वर्षी बाजारात विक्रीस ठेवल्या जातात. महापालिकेने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मुर्तीं दान उपक्रम घेणाऱ्या संस्थांवर लक्ष ठेवून मुर्त्या मोशीतील खाणीत विसर्जीत कराव्यात, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात शहर संघटक सौंदणकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी दोन दिवसांपूर्वी नागरिकांनी गणपती बाप्पांच्या मुर्ती विकत घेतल्या. त्यावेळी ना नफा ना तोटा तत्वावर बाजारात गणेश मुर्ती उपलब्ध होत्या. तर, काहींनी किंमत तुमची मुर्ती आमची असे उपक्रम घेतले. मागील वर्षी मुर्ती दानच्या नावाखाली संकलीत केलेल्या गणेश मुर्ती पुन्हा बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले आहे. जर असे होत असेल तर ही गणेश भक्तांची फार मोठी फसवणूक आहे.
जुन्या मुर्ती बाजारात विक्री करुन पैसे उकळण्यात येत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने संकलीत केलेल्या मुर्ती गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बाजारात विक्रीसाठी येत आहेत. वास्तविक महापालिकेने संकलीत केलेल्या गणेश मुर्ती मोशी येथील खाणीत विसर्जीत केल्या पाहिजेत. त्या पुन्हा पुढच्या वर्षी बाजारात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने याची खातरजमा करुन मुर्ती दान उपक्रण घेणाऱ्या संस्था व व्यक्तींना समज द्यावी. त्यांनी संकलीत केलेल्या मुर्ती पालिकेने ताब्यात घेऊन त्यांचे मोशी येथील खाणीत विसर्जन करावे, अशी मागणी सौंदणकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

















