न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२३) :- थेरगावातील कैलासनगर येथे एका चाळीतील खोलीमध्ये एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतले आहे. त्याच्या हातामध्ये माचीस आहे. तो स्वतःला पेटवून घेण्याच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रोहित दिवटे यांनी थेरगाव उपअग्निशमन केंद्रात येऊन सांगितली.
त्यानुसार थेरगाव उप अग्निशमन केंद्रातील एक बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी खोलीच्या खिडकीतून राहुल सुरेश किमडे याच्या अंगावर पाणी मारले. तसेच दरवाजा ब्रेकरच्या साह्याने तोडून त्यास बाहेर काढून वाकड पोलिसांच्या ताब्यात दिले.
हा प्रकार मंगळवारी (दि. ३) सायंकाळी साडेसात वाजता घडला. राहुल याने घरगुती कारणातून अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती वाकड पोलिसांनी दिली.












