- पीएमपीकडून प्रायोगिक स्वरूपात बदल; सेवा होणार वेगवान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०२३) :- पिंपरी चिंचवडसह पुणे शहराच्या जवळपास सर्वच भागांतील वाहतूक कोंडीमुळे बसला उशीर होत असल्याने ‘पीएमपी’ला अनेक फेल्या रद्द कराव्या लागत असून, त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. तसेच पीएमपीलाही आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी असणाऱ्या मार्गावर प्रवाशांना बस बदलून सेवा देण्याचा प्रयोग राबविण्याचे नियोजन ‘पीएमपी’ करत असून निगडी ते कात्रज दरम्यान धावणारी बस निगडीहुन शिवाजीनगर व तेथून पुढे कात्रज असा बदली प्रयोग करण्यात येणार आहे. त्यातून प्रवाशांचा वेळ वाचण्याची शक्यता आहे.
सकाळी आठ ते दुपारी एक आणि सायंकाळी सहा ते रात्री नऊ या दरम्यान शहरात सर्वत्र वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे ‘पीएमपी’च्या सर्व मार्गावरील बस नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. फेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांची गैरसोय आणि उत्पन्नाला फटका बसतो. कोंडीत फसल्याने रद्द होणाऱ्या फेऱ्यांवरील उपाय वाहतूक कोंडीत बस अडकल्यास प्रवाशांना खाली उतरून दुसऱ्या बसने सेवा देता येईल का, याची प्रायोगिक स्वरूपातील चाचपणी केली जाणार आहे.
पीएमपीच्या पिंपरी-चिंचवड पुणे या दोन्ही महापालिका क्षेत्रांसह पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत बसेवा पुरवली जात आहे. सकाळी लवकर आणि रात्री उशिराने धावणाऱ्याच बस निर्धारित वेळेत पोहोचत आहेत. मात्र, सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेतील बस उशिरा धावत असल्याने पुढील फेऱ्यांवर परिणाम होत आहे. यावर पर्याय म्हणून बस बदली प्रयोग राबविण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. यात लांब पल्ल्याच्या बसचे मार्ग मध्येच बंद केले जातील. वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणांच्या पुढे दुसऱ्या बसने सेवा देण्याचा प्रयत्न असेल. प्रायोगिक स्वरूपात हा बदल राबविला जाणार असून, त्यानुसार पुढील नियोजन केले जाईल, असे पीएमपीकडून सांगण्यात आले.
असा असेल प्रयोग…
कोडीच्या वेळी निगडीवरून थेट कात्रजला जाणाऱ्या बसला नियोजित वेळेपेक्षा अर्धा ते एक तास उशीर होऊ शकतो. उशिरा धावणाऱ्या बस पूर्ण मार्गावर संचलनात ठेवण्याऐवजी निगडीहून येणारी बस शिवाजीनगर अथवा शनिवारवाड्यापर्यंत धावणार. शिवाजीनगर / शनिवारवाडा येथे प्रवाशांना उतरवून स्वारगेट अथवा कात्रजला जाणाऱ्या बसमध्ये प्रवाशांना जागा दिली जाईल. निगडीतील प्रवाशांना स्वारगेट- कात्रजच्या दिशेने घेऊन पुढील बस घेऊन गेल्यानंतर ही बस पुन्हा नव्या प्रवाशांसह निगडीच्या दिशेने मार्गस्थ होईल.















