न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ०६ नोव्हेंबर २०२३) :- सृजन फाउंडेशनच्या अभंग इंग्लिश मिडीयम स्कूलमधील सर्व शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्या समन्वयातून दिवाळीनिमित्त अभंग दिवाळी मेळ्याचे आयोजन दरवर्षी केले जाते. दोन दिवस या दिवाळी मेळ्याने शाळेचा परिसर अगदी फुलून जातो. दिवाळी मेळ्यामध्ये शालेय परिसरात वेगवेगळे स्टाॅल्स लावले जातात. ज्यामध्ये विविध रुचकर खाद्यपदार्थ जसे वडापाव, पावभाजी, चायनीज, मसाला डोसा, पाणीपुरी, भेळ आदि पदार्थ म्हणजे खवय्यांसाठी मेजवानीच असते. मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ ज्यामध्ये मिकी माऊस, जंपींग जॅक सारख्या खेळण्या पालक व विद्यार्थ्यांच्या आकर्षण ठरल्या.
दिवाळीसाठी मुलांनी रंगविलेल्या पणत्या तसेच सजावटीसाठी लागणारे वेगवेगळे आकाशकंदील, अगरबत्ती, धूप, कापूर, वाती, तीळाचे तेल, तूपाचे दिवे, तोरणं, रांगोळ्यांचे सुंदर व आकर्षक छाप महिला पालकांचे लक्ष वेधून घेत होते. दिवाळीत लहान मुले जो किल्ला बनवितात त्या किल्ल्यावर मांडण्यासाठी जवळपास ४१ प्रकारांचे मावळे बालचमूंना आकर्षित करत होते. टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविण्याचे आवाहन विद्यार्थ्यांसह पालकांना करण्यात आले होते, त्याला साद घालत पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागातील पालक व विद्यार्थ्यांनी आपल्या हस्तकौशल्यातून बनविलेल्या सुंदर कलाकुसरीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.
लहान मुले व महिला यांच्यासाठी मेहेंदी व टॅटू चा स्टाॅल लावण्यात आला होता. याशिवाय शाळेतील शिक्षकांच्या कल्पकतेतून साकारलेल्या १२ खेळांमुळे दिवाळी मेळ्याची शोभा वाढवली. या खेळांमधून मुलांची एकाग्रता, समतोल, बौद्धिक क्षमता, लवचिकता, आदि क्षमतांचा विकास होण्यास मदत होईल, म्हणून या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळात जिंकलेल्या विद्यार्थ्यांना मुलांनीच बनविलेल्या कलाकुसरीच्या वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या.
या दिवाळी मेळ्यातून आलेला नफा मामुर्डी येथील ‘माई बालभवन’ या दिव्यांग व अनाथ मुलांसाठी सेवाकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेस देणगीरुपाने देण्यात येणार आहे.
अभंग दिवाळी मेळ्याच्या पहिल्या दिवशी माई बालभवन या संस्थेचे प्रमुख मधुकर इंगळे व देहूतील उद्योजिका अनुपमा एकांडे व त्यांचे पती वसंतराव एकांडे यांच्या हस्ते दिवाळी मेळ्याचे उद्घाटन करण्यात आले. या दोन दिवसीय दिवाळी मेळ्याला देहू देवस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे, टी.एन.टी. पॅकेजिंग कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर निनाद नेमाडे, ज्योतिषतज्ञ दत्तात्रय अत्रे, डॉ. विद्या पठारे, प्रा. दिपाली जोशी, सेवानिवृत्त प्राचार्य विठ्ठल निम्हण, अँड. संजय भसे आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.
सृजन फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील कंद, सचिव प्रा. विकास कंद शाळेच्या प्राचार्या डॉ. कविता अय्यर, उपप्राचार्या शैलजा स्वामी, समन्वयक शुभलक्ष्मी पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच ॲडमिन स्टाफ, सर्व बसचालक, पालक, विद्यार्थी यांच्या सहकार्यातून व योगदानातून अभंग दिवाळी मेळा अगदी उत्साहात पार पडला .