न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ०७ नोव्हेंबर २०२३) :- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खासगी बसेचे भाडेदर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या भाडेदराच्या दीडपटीपेक्षा जास्त असल्यास [email protected] या ई-मेलवर किंवा ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या टप्पा वाहतूकीचे भाडेदर विचारात घेवून खासगी बसचे त्या संवर्गासाठीचे कमाल भाडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या भाडेदराच्या दिडपटीपेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजी शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काही खासगी प्रवासी बसेस सणासुदीच्या व गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असतात. त्या पार्श्वभूमीवर शासनाने निश्चित केलेल्या भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स, बसेस यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. खासगी बस मालक चालक यांनी नियमानुसार प्रवासी तिकीटदराची आकारणी करावी, असेही आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी केले आहे.