- वाहनांची तोडफोड आणि लुटमारीच्या लागोपाठच्या घटनेमुळे परिसरात दहशत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२४) :- काळेवाडीतील नढेनगर आणि डी मार्टच्या पार्किंग परिसरात टोळक्याने रात्रीच्या सुमारास लागोपाठ वाहनं फोडली. तसेच लुटमारीचा प्रकारही घडला आहे. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. वाकड पोलीस ठाण्यात टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून काहींना अटक करण्यात आली आहे.
पहिली घटना हातामध्ये कोयते, लाकडी दांडकी घेवुन आरोपी बेकायदेशीरपणे एकत्र आले. त्यांच्याजवळील कोयते, लाकडी दांडकी हवेत फिरवत आजुबाजुला राहणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण केली. कोयता व लाकडी दांडक्याने गल्लीतील रस्त्याच्या कडेला असलेली रिक्षा व मोटारसायकल फोडुन तिचे नुकसान केले. फिर्यादीच्या खिशातील २१०० रुपये जबरदस्तीने काढून घेत त्यांना धमकी देवुन परिसरात दहशत निर्माण केली आहे.
हा प्रकार (दि. ०३) रोजी रात्री ००.४० ते ०१.०० च्या दरम्यान शिवकृपा कॉलनी, नढेनगर, काळेवाडी येथे घडली. रोहित प्रभाकर वाघमारे यांनी आरोपी १) सिध्दार्थ संजय जगताप, २) आयुष सुनिल खैरे, ३) हर्ष विनोद महाडिक, ४) विधीसंघर्षीत बालक, ५) विधीसंघर्षात बालक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी ११२/२०१४ भा.द.वि.कलम ३९५, ४२७, ५०६ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ३७ (१) (३) सह १३५ व क्रिमीनल लॉ अमेडमॅन्ट कायदा कलम ३, ७ नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी क्र २ व ३ अटक आहेत. पोउपनि जोंधळे पुढील तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत काळेवाडीतील एमएम कॉलेज चौकाजवळील डीमार्ट पार्कींगमध्ये (दि. ०२) रोजी रात्री ९.३० ते १०.३० च्या दरम्यान आरोपींनी हातातील लोखंडी कोयते व दगडांनी पार्कीगमधील गाडयांच्या काचा फोडल्या. फिर्यादीला लोखंडी कोयत्याचा धाक दाखवीत खिशातील रोख रक्कम १४०० रुपये जबरीने काढुन घेतले.
हातातील कोयते हवेत भिरकावुन आरडा ओरड केल्याने तेथे जमा झालेल्या लोकांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे लोक घाबरुन पळुन गेले, असे फिर्यादीत नमूद आहे. फिर्यादी महेंद्र प्रकाश सावंत यांनी आरोपी १) शुभम अशोक तापकीर, २) व इतर अनोळखी ०६ इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ११६/२०२४ भादविक ३९५, आर्म अॅक्ट कलम ४,२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम ३,७ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी क्र १ याला अटक केली आहे. पोउपनि चव्हाण तपास करीत आहेत.













