- लवकरच सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे आयुक्तांकडून ‘ई बजेट’ होणार सादर..
- निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांना अर्थसंकल्पातून काय मिळणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे संगणक प्रणालीद्वारे ई-बजेट तयार करण्यात येणार आहे. सुमारे ७ हजार कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त सादर करणार आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांना या अर्थसंकल्पातून काय मिळणार? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या लेखा विभागाच्या वतीने अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी महापालिकेच्या विविध ५२ विभागांना माहिती देण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी सूचना केल्या आहेत. गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेने ई बजेट सादर करण्याचे धोरण स्वीकारले आहे. ती माहिती विविध विभागप्रमुखांच्या संगणक प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. प्रत्येक विभागाने सॉफ्टवेअरमध्ये भरलेली माहिती लेखा विभागाकडे जमा होईल, त्यामधून लेखा विभाग पुढील कार्यवाही करणार आहे. लेखा विभागाने ई बजेट करण्यासाठी नॅशनल म्युन्सिपल अकाउंटिंग मॅन्युअल या संगणक प्रणालीतून सन २०२३-२४ चे सुधारित व सन २०२४-२५ च्या मूळ तरतुदी महसुली किवा भांडवली लेखाशीर्षावर भरण्यास सांगण्यात आले आहे. त्यासाठी कार्याच्या याद्या उपलब्ध करून दिलेल्या मेन्यू व एक्सेल फॉरमॅटमध्ये अपलोड करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच निधी वर्ग केल्याच्या नोंदी असतील, तर त्याबाबतही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कळवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे बहुतांश विभागाने कामे सुचवली आहेत. त्यानुसार, महापालिकेचे यंदाचे सुमारे ७ हजार कोटी रुपयांचे बजेट डिजिटल प्रणालीने तयार करण्याचे काम सुरू आहे.
लेखा विभागाच्या वतीने विविध विभागांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये विभागाच्या वतीने सॉफ्टवेअरवर देण्यात आलेल्या माहितीची खातरजमा केली जात आहे, तसेच सादर केलेल्या कामांवर चर्चा केली जात आहे. नागरिकांनाही १० लाख रुपयांपर्यंतची कामे सुचवण्यास सांगितले होते. त्यातील योग्य कामांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही करसंकलन विभागाच्या वतीने मिळकतकरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे मिळकतधारकांना दिलासा मिळाला आहे. मिळकतकर दरात वाढ न करता वसुलीवर भर देण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापालिकेच्या वतीने अर्थसंकल्पाचे काम सुरू आहे. त्यासाठी महापालिकेच्या विभागप्रमुखांसोबत बैठका सुरू आहेत. त्यांच्या विभागाचा आढावा घेतला जात आहे. लवकरच महापालिका आयुक्त स्थायी समितीच्या बैठकीमध्ये अर्थसंकल्प सादर करतील, असे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी रविंद्र जैन यांनी सांगितले.


















