न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील अतिक्रमणांवर नियमितपणे कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी नेमलेल्या २८ वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे त्या वाहनांद्वारे कोणत्या भागांत कारवाई सुरू आहे किंवा नाही, यांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजणार आहे.
अतिक्रमण कारवाईसाठी महापालिकेने २८ वाहने नेमली आहेत. ती वाहने दिवसभर कारवाई करणे सोडून कोठे तरी थांबून वेळ घालवितात. तसेच, जप्त केलेले साहित्य व सामग्री गायब करण्याच्या घटना वाढल्या आहेत. दिवसभर कारवाई व्हावी, यासाठी वाहन दिलेल्या भागांत नियमितपणे फिरविण्यासाठी त्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी घेतला आहे. त्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली होती.
एका वाहनांसाठी तीन वर्षांसाठी १६ हजार रुपये असा सर्वांत कमी दर प्राप्त झाला आहे. सर्व २८ वाहनांसाठी एकूण ४ लाख ४८ हजार रुपये खर्च येणार आहे. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. लवकरच सर्व वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यामुळे त्या वाहनांचा नेमून दिलेल्या भागांत दिवसभर कारवाई करावी लागणार आहे. जप्त केलेले साहित्य व सामुग्रीचे छायाचित्र घ्यावे लागणार आहे. ते साहित्य गोदामात जमा केल्याचेही छायाचित्र घ्यावे लागणार आहे. ती छायाचित्र मोबाईल अॅपवर अपलोड करावी लागणार आहेत. त्यामुळे वाहनांवर असलेल्या अतिक्रमणविरोधी पथकास दिवसभर कारवाई करणे बंधनकारक असणार आहे.
जीपीएस यंत्रणा लावण्याने त्या वाहनांना दिवसभर किंवा सकाळी किंवा संध्याकाळी कारवाई करावी लागणार आहे. कारवाई न करता वाहन एकाच जागी असल्यास त्या पथकावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. तसेच, जप्त केलेल्या साहित्यांचे छायाचित्र मोबाईल अॅपवर अपलोड करणे सक्तीचे केले आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जांभळे यांनी सांगितले.











