न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२४) :- चाकण औद्योगिक वसाहतींकडून येणाऱ्या वाहतुकीमुळे तळवडे परिसरात वाहहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हा भाग रेडझोन हद्दीत येत असल्यामुळे रस्ते विकसित होत नाहीत. तळवडे येथे रस्त्यांसाठी भूसंपादन मोबदला (टीडीआर) ५० टक्के मिळतो. त्यामुळे अनेक वर्षापासून रस्ते विकसित झालेले नाहीत. शहरातील इतर भागात रस्त्यासाठी मिळणारा मोबदला व टीडीआर तळवडे रेडझोन हद्दीतील शेतकरी व जागामालकांना १०० टक्के मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाला तातडीचे निर्देश दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर व चाकण एमआयडीला जोडणारा तळवडे- निगडी हा एकमेव रस्ता आहे. चाकण, म्हाळुंगे एमआयडी, तळवडे आयटी पार्क तसेच, देहू, निघोजे परिसरातून पिंपरी-चिंचवड शहरात याच रस्त्याने अवजड वाहतुक होत असते. या रस्त्यावर ४० फुटापेक्षा लांबीची वाहने व कंटेनर यांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. तीन किलोमीटर प्रवासासाठी २ ते ३ तास लागतात. या रस्त्याला पर्यायी रस्ता नसल्याने वारंवार अपघात होत असतात. तळवडे, रुपीनगर, त्रिवेणीनगर, जोतिबानगर व गणेशनगर भागातील रहिवाशांना वाहतूक कोंडीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तळवडे रहिवाशी व औद्योगिक परिसरातील लघुउद्योजक पर्यायी रस्त्यासाठी वारंवार मागणी करत आहेत.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे व माजी नगरसेवक पंकज भालेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्याच्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्याशी बोलून आयुक्त शेखर सिंह यांना संबंधित प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठविण्याचे निर्देश दिले. त्यामुळे तळवडे, चिखली, शिवरस्ता व रेडझोन हद्दीत असणारे रस्ते विकसित होण्यासाठी त्याचा उपयोग होईल.











