न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांची परिस्थिती किती दयनीय आहे याची आज पुन्हा एकदा पुनरावृत्ती बघायला मिळाली. चिंचवड गावातील हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर येथील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या सार्थक कांबळे याचा शाळेच्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावरील जिन्याच्या रेलिंगवरून घसरगुंडी खेळताना तोल जाऊन जिन्याच्या डक्टमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मनपा शाळेमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही महापालिकेची आहे. सार्थकच्या मृत्यूला पिंपरी चिंचवड मनपाचे निष्क्रिय प्रशासन सर्वस्वी जबाबदार आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी केला असून मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
महापालिकेच्या वतीने सर्व मनपा शाळांचे सर्वेक्षण (structural audit) मागील दोन महिन्यापूर्वी केले. त्या सर्वेक्षणाचे काय झाले? फक्त समिती नेमून, सर्वेक्षण करून फक्त कागदी घोडे नाचवायचे आणि नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करायची. अंमलबजावणी झाली असती तर आज एका निष्पाप जिवाचे प्राण वाचले असते. जिन्याच्या लोखंडी रेलिंगवरून विद्यार्थी खाली पडतो म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कुठलीही सोय नसल्याचे दिसून येत आहे. शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीये, स्वच्छता नाहीये, सुरक्षा रक्षक नाहीयेत, शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवायचं सोडून इतर कामे दिली जातायेत, संपूर्ण शाळेची दुरवस्था झालेली आहे.
मनपाच्या वतीने नागरिकांच्या पैशाने अनेक वेळा नगरसेवक, अधिकारी, शिक्षक यांनी आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकार मधील शाळांना भेट दिली. तेथील शालेय व्यवस्था बघितली परंतु त्याची अंमलबजावणी शहरामध्ये केली नाही आणि त्याचा परिणाम आज परत बघायला मिळाला. अजून किती दिवस नागरिकांनी या सर्व व्यवस्थेला बळी पडायचं असा सवाल आपचे बेंद्रे यांनी केला आहे. चिंचवड़ येथील घटनेला सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार असल्याने आयुक्त शेखर सिंह यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे चेतन बेंद्रे यांनी मत व्यक्त केले.











