न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२४) :- निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी झाल्या. महापालिकेचे सहायक आयुक्त विठ्ठल जोशी यांची बदली गडचिरोलीला, तर अविनाश शिंदे यांची बदली लातूर येथे करण्यात आली आहे.
आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. महसूल आणि वनविभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील आणि प्रतिनियुक्तीवरील अधिका-यांच्या शुक्रवारी सायंकाळी बदल्या झाल्या.
महापालिकेच्या प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त विठ्ठल जोशी मूळचे नागपूर महसूल विभागातील आहेत. त्यामुळे त्यांची बदली निवडणूक अधिकारी पदावर गडचिरोली येथे झाली आहे. पुढील महिन्यामध्ये त्यांचा दोन वर्षाचा कालखंड पूर्ण होणार होता.
महापालिका निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांची बदली लातूर येथे झाली आहे. सहा महिन्यांपूर्वीच प्रतिनियुक्तीवर आले होते. मात्र, त्यांचा महसूल विभाग पुणे असल्याने त्यांची बदली लातूर येथे करण्यात आली आहे. राज्याचे उपसचिव संतोष गावडे यांनी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी संर्वगातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार राज्यभरातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.














