- इमारतीचे पहिल्या टप्यातील बांधकामाचे भूमिपूजन ३ मार्चला..
- सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची प्रमुख उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथील प्रस्तावित न्याय संकुलाच्या इमारतीचे पहिल्या टप्यातील बांधकामाचे भूमिपूजन ३ मार्च रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, अभय ओक आणि प्रसन्न वराळे यांनी येण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती अॅड. रामराजे भोसले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतीश लांडगे आणि धनंजय कोकणे उपस्थित होते.
शहरातील मोशी सेक्टर नं. १४ मधील १५ एकर जागेमध्ये न्याय संकुल उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्यातील बांधकाम प्रारूप आराखड्यानुसार २५ न्यायालये बांधण्यात येणार आहेत. यात दिवाणी न्यायाधीश १२ कनिष्ठ स्तर, ७ वरिष्ठ स्तर आणि ६ जिल्हा व सत्र न्यायालयांचा समावेश आहे. निवासस्थानेही बांधण्यात येणार आहेत. या बांधकामासाठी अंदाजे १२४.५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. न्याय संकुलाचे बांधकाम २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
या न्याय संकुलाचे भूमिपूजन ३ मार्च रोजी दुपारी ४ वाजता करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मुख्य न्यायाधीश महेंद्र महाजन असतील. या कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती डेरे, संदीप मारणे, आरिफ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. या न्याय संकुलामुळे पिंपरी-चिंचवड शहारातील नागरिकांना पुणे न्यायालयामध्ये हेलपाटे मारावे लागणार नाहीत, असे भोसले यांनी सांगितले.














