न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२४) :- किल्ले शिवनेरीवर होत असलेल्या शिवजयंतीच्या मुख्य कार्यक्रमाचे सभास्थळ यंदा बदलण्यात येणार आहे. नागरिकांना दर्शनासाठी तिष्ठत राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. केवळ मुख्य कार्यक्रमादरम्यान दर्शनरांग थांबविण्यात येणार असून त्यानंतर दर्शनरांग सुरूच राहणार असल्याचेही ते म्हणाले.
शिवजयंती महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होतो. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गडावर येत असतात. तसेच राज्यभरातून नागरिकही मोठ्या संख्येने येत असतात. या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रणासाठी गडावरील मुख्य सभेचे ठिकाण बदलण्यात येणार आहे. याबाबत भारतीय पुरातत्त्व विभागाशीही प्रशासनाकडून चर्चा करण्यात येत आहे. शिवजयंतीनिमित्त आयोजित आढावा बैठकीत दिवसे यांनी निर्देश दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आणि पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, उप वनसंरक्षक अमोल सातपुते यांनी शिवनेरी गडावर भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली.
किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी वीज उपलब्ध होण्यासाठी सौर पॅनल बसविण्याबाबत महाऊर्जाकडून तांत्रिक आणि व्यवहार्यता तपासणी करण्यात येत आहे. ड्रोनद्वारे गर्दीची पाहणी आणि नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणे- कडून सार्वजनिक उद्द्घोषणा यंत्रणा, मेगाफोन देण्यात येणार आहेत. शिवजन्मोत्सवात पुरेशा प्रमाणात राखीव खाटा, अतिदक्षता खाटा, आरोग्य पथकांची नेमणूक, रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार आहेत. तसेच पाणी तपासणी, शुद्धीकरण केले जाणार आहे. फिरती आणि स्थिर तात्पुरती स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.
नागरिकांना हत्ती दरवाजा, मीना दरवाजा, कुलूप दरवाजा या ठिकाणी, तसेच अन्य ठिकाणीही कार्यक्रम पाहण्यासाठी एलईडी पडद्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी अत्यंत मर्यादित स्वरूपात प्रवेशिका देण्यात येणार आहेत.
– डॉ. सुहास दिवसे, जिल्हाधिकारी…














