- क्लस्टर भूखंड वाटपाला एमआयडीसीकडून स्थगिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२४) :- राज्यातील उद्योगवाढीकरिता पूरक धोरण म्हणून स्विकारलेल्या क्लस्टर भूखंड वाटपाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्थगिती दिली आहे. या भूखंडाच्या आरेखनामध्ये छोटे भूखंड तयार होत असल्याने पायाभूत सुविधा पुरविताना अधिकचा बोजा पडत असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच औद्योगिक वसाहतीमधील क्लस्टर भूखंड वाटपाला आता ब्रेक लागला आहे. सर्वसमावेशक धोरण ठरल्यानंतर क्लस्टर भूखंड वाटपाला पुन्हा सुरूवात होणार आहे.
राज्यातील उद्योगवाढीला पूरक धोरण म्हणून एमआयडीसीने विविध योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये एक खिडकी योजना, इज डुइंग बिझनेस व कस्टर भूखंड वाटप यांसारख्या विविध योजनांचा समावेश आहे. त्यापैकी एकमेकांशी निगडीत असलेले उद्योग एकाच छताखाली आणण्यासाठी एमआयडीसीने क्लस्टर भूखंड वाटप योजना सुरू केली होती. यामध्ये माल उत्पादन साखळी व मालावरील प्रक्रिया असे परस्परपूरक उद्योग एकमेकांच्या जवळ असल्यास वाहतूक खर्च वाचून तंत्रज्ञानाची अदलाबदल केल्यास तुलनेत उत्पादनाला कमी खर्च येतो. ही बाब डोळ्यासमोर ठेवून क्लस्टर भूखंड वाटप योजना सुरू केली होती.
दरम्यान, आमदार भरतशेठ गोगावले यांनी या योजनेचे दुष्परिणाम विषद करणारे लेखी पत्र एमआयडीसी प्रशासनाला दिले आहे. या पत्राचा संदर्भ देत, ही क्लस्टर योजना उद्योगवाढीला कशी अडचणीची ठरत आहे, हे विषद करत, या योजनेला एमआयडीसी प्रशासनाने स्थगिती दिली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये इंजिनिअरिंग क्लस्टर या योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड औद्योगिक वसाहतीमधील चिंचवड येथे इंजिनिअरिंग क्लस्टरची उभारणी करण्यात आलेली आहे. यामध्ये अभियांत्रिकीमधील नवनव्या संकल्पना व उत्पादन वाढीविषयीचे काम चालते. विविध उपक्रमांमधून तंत्रज्ञानाची आदानप्रदान केली जात आहे. हे उद्योगवाढीला पूरक आहे. छोटे भूखंड आरेखनामुळे रस्त्याकरिता अधिकची जागा वापरावी लागते. भूखंडांना पायाभूत सुविधा पुरविताना आधिकचा बोजा पडतो. त्यामुळे अन्य औद्योगिक वसाहतींमध्ये जागा उपलब्ध असलेल्या अन्य औद्योगिक वसाहतींना फटका बसतो.
क्लस्टर भूखंड वाटपाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने स्थगिती देणं ही चुकीची बाब आहे. अशाने मोठे उद्योजकदेखील अडचणीत येतील. छोटे उद्योजक व्यवसाय कसे करणार? एमआयडीसीमध्ये प्लॉट न मिळाल्यास छोटे उद्योजक इंडस्ट्रीयल अथवा शेती झोनमध्ये एक, दोन, पाच गुंठे जागा घेऊन व्यवसाय सुरु करतील. अशा छोट्या उद्योगांना व्यवसाय करता आला नाही तर, या मोठ्या कंपन्यांना देखील व्यवसाय करणे अवघड होईल. हे MIDC चे चुकीचे धोरण आहे. मा. जयदेव अक्कलकोटे, (अध्यक्ष – चाकण MIDC उद्योजक संघटना)…