न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा बागलबुवा करून महामंडळास मिळणारा एन. एस. एफ. डी. सी. योजना, महीला समृध्दी योजना, बिजभांडवल योजना व निधी आदी समाजपयोगी योजना शासनाने बंद केलेल्या आहेत.
यामुळे मागासवर्गीय समाजाला मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यावर टाच आली असून महामंडळ रद्दबातल केल्यामुळे समाजातील होतकरू, गरजू, अनाथ नागरिकांना आर्थिक समस्येशी झुंज द्यावी लागत आहे.
शासनाच्या या निर्णयाच्या निषेधार्थ मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणास बसलेले समाजबांधव प्रशांत सदामते व संजय लोखंडे यांना शिवसेना राहटणी-काळेवाडी विभाग व शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी पाठींबा जाहीर केला असून मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नी लक्ष घालून महामंडळ जैसे ते स्वतंत्र ठेवण्याची मागणी केली आहे.
भाजप सरकारने अण्णाभाऊ साठे महामंडळास भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून समाजातील बेरोजगार युवकांना रोजगाराकरीता महामंडळाकडून विविध योजनांतर्गत भरघोस प्रमाणात कर्ज मिळेल व विकसित समाज होण्यास सहाय्यभूत ठरेल. अन्यथा याचा परिणाम आगामी निवडणुकीवर होईल असा इशारा दाखले यांनी भाजप सरकारला दिला आहे.