- सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची प्रमुख उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२४) :- मोशी-बो-हाडेवाडी येथील पेठ क्रमांक १४ येथे प्रस्तावित असलेल्या न्यायसंकुलाचे भूमिपूजन रविवारी (दि. ३) दुपारी ४ वाजता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्रकुमार उपाध्याय आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे असणार आहेत. तर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मारणे, न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश (पुणे) महेंद्र महाजन हे उपस्थित राहणार आहेत.
न्यायसंकुल इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम प्रारुप आराखड्यानुसार एकूण २५ न्यायालये तयार होणार आहेत. त्यामध्ये दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर १२, वरिष्ठ स्तर ७, जिल्हा व सत्र न्यायालय ६ व त्यास अनुसरुन निवासस्थाने मंजूर झालेले आहेत. न्यायसंकुलाचे बांधकाम २ वर्षात पूर्ण केले जाणार आहे.
सध्या नेहरुनगर, पिंपरी येथे न्यायालयाचे कामकाज सुरू आहे. मोशी येथे न्यायसंकुलाची उभारणी झाल्यानंतर तेथे न्यायालयासाठी विस्तृत जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वकील, पक्षकार, नागरिक या सर्वांचीच सोय होणार आहे.

















