न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२४) :- भारत हिंदू राष्ट्र घोषित करणे हे ध्येय समोर ठेवून सनातन संस्था कार्य करीत आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे राजकीय नव्हे तर राष्ट्रनिष्ठ आणि धर्माधिष्ठित जीवन जगण्याची एक प्रगल्भ संस्कृती, राज्यव्यवस्था आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर या कार्याला अधिक वेगाने सुरूवात झाली आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केले.
सनातन संस्थेच्या स्थापनेस २५ वर्ष पूर्ण झाली. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी (१ मार्च) पुण्यात राजहंस यांनी माध्यम प्रतिनिधींशी मुक्त संवाद साधला. यावेळी सनातन संस्थेचे चैतन्य तागडे आणि साधक उपस्थित होते.
गोवा येथे १९९८ मध्ये प.पू. भक्तराज महाराजांच्या आदेशाप्रमाणे प.पू. डॉ. जयंत आठवले यांनी सनातन संस्थेची स्थापना केली. स्थापनेपासून संस्था सर्व सामान्य जनतेमध्ये धर्म शिक्षणाचे कार्य करीत आहे. मधल्या कालखंडात सनातन संस्थेच्या कार्यावर टीका केली गेली. सत्ताधाऱ्यांनी सनातन संस्था ‘सॉफ्ट टार्गेट’ करण्यास सुरुवात केली. बॉम्बस्फोट घटना, डॉ नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येमागे सनातन संस्था असल्याचे सांगितले गेले. संस्थेच्या साधकांना अटक करण्यात आली. परंतु हे साफ चुकीचे आहे. तपासयंत्रणा याबाबत न्यायालयात कुठलेही ठोस पुरावे देऊ शकले नाही. ज्यांच्यावर आरोप ठेवण्यात आले त्यांना जामिनावर सोडण्यात आले. शेवटी सत्याचा विजय होईल याची खात्री आहे, असे राजहंस म्हणाले.
पुढील २५ वर्षांचा काळ ‘हिंदू राष्ट्र’ निर्माण करणे हा सनातनचा उद्देश आहे. २०२४ नंतर देशात सात्विक काळ येणार आहे. या काळात सत्वगुण शक्तींचा प्रभाव वाढेल असे राजहंस यांनी सांगितले. आभार चैतन्य तागडे यांनी मानले.

















