- पोलिसांनी अंबाजोगाई येथुन केली सुटका..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२४) :- पायी चालत निघालेल्या मेंढपाळाचे पैसे वसुलीसाठी चिंचवडमधुन जबदस्तीने फरफटत नेवुन चारचाकी गाडीत कोंबुन अपहरण केले होते. पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने अंबाजोगाई बीड येथुन मेंढपाळाची सुटका केली आहे. तसेच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तुकाराम साधु शिंपले (वय ४० वर्षे) अशी सुटका झालेल्या मेंढपाळाचे नाव आहे. (दि. २८/०२/२०२४) रोजी सकाळी ०७.०० च्या सुमारास धनेश्वर मंदीर, चिंचवडगांव येथून त्याचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी चिंचवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
धनेश्वर मंदीराच्या गोशाळेतील गायी राखण्याचे काम सदर व्यक्ती करीत होता. त्याची पत्नी धनेश्वर मंदीराची साफसफाई करुन बेलपाने विक्री करीत होती. तुकाराम हा रोज पहाटे बेलाची पाने घेवून येवून गायी चारण्यासाठी जात होता. नेहमीप्रमाणे बेलाची पाने घेवून रस्त्याने पायी चालत येत असतांना धबा धरुन बसलेल्या अज्ञात इसमांनी त्याचेवर झडप घालुन फरफटत नेत पांढ-या रंगाच्या चाकीचाकी गाडीमध्ये कोंबले व गाडी सुसाट वेगाने नेली. घटनास्थळी शिवतिर्थ बिल्डींग समोर रोडवर एक सुती पिशवी व चप्पल मिळुन आली, चप्पलची बारकाईने पाहणी केली असता धनगर समाज व ठराविक समाजाचे लोक वापरत असलेली चप्पल असल्याचे दिसुन आले. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यांची तपासणी केली असता त्यामध्ये संशयित आरोपी व अपहरण करणेसाठी वापरलेली चारचाकी वाहन दिसून आले. गाडीचे नंबर प्लेटला चिखल लावणेत आला होता त्यामुळे गाडी मालकाची माहीती मिळून आली नाही. गाडी गेलेल्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करीत मागोवा घेतला असता गाडी बीड जिल्हयामध्ये गेल्याचे स्पष्ट झाले.
गुन्हे शाखेचे पोलीस पथक तात्काळ बीड येथे रवाना झाले. आरोपींचा मागोवा घेवून गुन्हयाचा सखोल तपास करुन कसोशिने शोध घेतला. किडनॅप करण्यात आलेला तुकाराम शिंपले हा चिचवड येथे राहणेस येण्यापुर्वी आंबेजोगाई बीड येथे शेळ्या-मेंढया खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत होता. मध्यस्ती केलेल्या व्यवहारामधील खरेदीदार यांनी पैसे परत न दिल्यामुळे लोक वारंवार पैसे मागत असल्यामुळे शेती, दागीने विकुन काही लोकांची देणी देवून उपजिविकेच्या कामासाठी चिंचवड येथे येवून राहत असलेची माहीती मिळाली. काळयाचीवाडी ता. धारुर जि. बीड येथील ज्ञानेश्वर यादव रुपनर हा इसम चिंचवड येथे गेले आठ दिवसापूर्वी दोन ते तीन वेळा येवून गेल्याची गोपनिय माहीती मिळाली. त्या अनुषंगाने तपास पथकाने संशयित आरोपीचा शोध घेतला असता सदरचा भाग हा अत्यंत दुर्गम दळण-वळणाच्या सुविधा नसलेला व डोंगर- द-यांचा असल्याने अतिशय अडचणी येत होत्या, कोणत्याही प्रकारे निटनिटके मोबाईल नेटवर्क मिळत नव्हते.
तपास पथकाने वेशांतर करुन सलग दोन दिवस संशयिताचे घर परिसरात सापळा लावुन पाहणी केली असता ज्ञानेश्वर रुपनर याच्या हालचाली संशयित दिसुन आल्या म्हणुन ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर यय २२ वर्षे धंदा- मजुरी रा.काळयाची वाडी ता. धारुर जिल्हा बीड यास घेराव घालुन पाठलाग करुन शिताफीने ताब्यात घेतले. त्याचेकडे तुकाराम शिंपले याचेबाबत विचारपुस केली असता तो काही एक समाधानकारक माहीती देत नव्हता. त्याचे घर परिसराची बारकाईने तपासणी करुन शोध घेतला असता एका पत्र्याचे खोलीला कुलुप असल्याचे दिसुन आले. पत्र्याचे खोलीतुन कोणीतरी आतमध्ये असलेचा संशय आल्याने लागलीच कुलूप तोडून पाहणी केली असता अपहरीत इसम तुकाराम हा मिळून आला त्याची सुरक्षितरित्या सुटका केली.
सखोल तपासामध्ये असे निष्पन्न झाले कि, मेंढपाळ रघुनाथ नरुटे याच्या शेळया-मेंढी विक्री व्यवहारामध्ये तुकाराम शिंपले याने मध्यस्ती केली होती. परंतू खरेदीदार याने साडेचौदा लाख रुपये न दिल्याने तो तुकाराम शिपले याचेकडे वारंवार पैसे मागत होता. पैसे न दिल्याचे रागातुन रघुनाथ नरुटे याने त्याचा भाचा ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर व भाच्याचे मित्र संदीप विक्रम नकाते, हंसराज सोळुंके व नितिन जाधव यांना अर्टीका गाडी नंबर एम एच ०४ एफ ड्रोड ९४१७ भाडयाने करुन देवून तुकाराम शिपले याचे किडनॅप करणेची सुपारी दिली होती. अर्टीका गाडी नंबर एम एच ०४ एफ झेड ९४१७ सह आरोपी ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब यादव रुपनर वय २२ वर्षे धंदा- मजुरी रा. काळयाची वाडी ता. धारुर जिल्हा बीड यास चिंचवड पोस्टेला गुन्हयाचेकामी हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे.
कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक गणेश माने, सपोफी दिपक खरात, जयवंत राऊत, आतिष कुडके, संदेश देशमुख, देवा राऊत यांनी केली आहे.















