- पोलीस आयुक्तांकडून निलंबन तर दोन पोलीस सेवेतून बडतर्फ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मार्च २०२४) :- मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थासह अटक केलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याच्या मोटारीतून आणखी दोन किलो ४०० ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे.
या उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. तर, दोन पोलीस कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत.
पिंपळेनिलख रक्षक चौकात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या नमामी झा या हॉटेल कामगाराला पोलिसांनी दोन कोटी रूपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थासह अटक केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात मेफेड्रोन कोठून आणले याची विचारणा पोलिसांनी केल्यावर नमामीने निगडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक शेळके याचे नाव घेतले होते. चौकशी केली असता शेळकेचा सहभाग स्पष्ट झाला. त्याला ४४ किलो ७९० ग्रॅम किलो वजनाच्या ४४ कोटी ७९ लाख ८० हजार रुपयांचे मेफेड्रोनसह अटक करण्यात आली होती.