न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मार्च २०२४) :- मुकाई चौक ते किवळेगाव परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर खोदकाम करण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले नाही. त्यामुळे विनापरवाना खोदकाम करणाऱ्या लिपारु इन्फ्रा लि या कंपनीचे फारुक खान (रा. साईनाथ नगर, निगडी) यांच्यावर वाहतूक विभागाची परवानगी न घेता सार्वजनिक रस्त्यावर वाहनांना अडथळा होईल अशा प्रकारे खोदकाम केल्या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात भा.दं.वि.स कलम २८३, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सार्वजनिक रस्त्यावर चालणाऱ्या तसेच चालु करण्यात येणाऱ्या खोदकामास पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेकडील ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. संबंधीत ठेकेदार हे खोदकाम करायच्या अगोदर वाहतूक शाखेकडील परवानगी मिळण्यासाठी कार्यालयास अर्ज करत असतात. त्यानंतर त्यांना वाहतूक शाखेकडील योग्य त्या अटी व शर्ती घालून ना-हरकतपत्र देण्यात येत असते.
सदरचे ना-हरकपत्र दिल्यानंतर काम करत असताना वाहतुक विभागाने घालुन दिलेल्या अटी व शर्तीचे पालन ठेकेदार करत नसल्याचे वारंवार दिसुन येत आहे. तसेच ठेकेदार परवानगी मिळण्यासाठी कार्यालयाट अर्ज करुन वाहतुक शाखेकडील परवानगी देण्या अगोदर, परवानगी न घेता काम चालु करत असल्याचे निदर्शनास येत होते. विभागाकडील परवानगी न घेता काम केल्याने खोदकामामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेअंतर्गत असलेल्या वाहतुक विभागात परवानगी न घेता करण्यात येणाऱ्या खोदकामांची पाहणी करुन गुन्हे दाखल करण्याचे आदेश वाहतूक विभागांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोणीही विना परवानगी सार्वजनिक रस्त्यावर खोदकाम करणार नाही. विना परवानगी खोदकाम केल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी कळविले आहे.


















