न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२४) :- महापालिकेचे उपायुक्त अजय चारठाणकर, मिनीनाथ दंडवते यांची मंगळवारी बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीचा आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी-छापवाले यांनी काढला आहे. या बदलीचा आदेश काढताना त्यांना दुसऱ्या ठिकाणी देण्यात येणाऱ्या पदस्थापनेबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
महापालिकेचे उपायुक्त अजय चारठाणकर महापालिकेत ऑगस्ट २०२० ला उपायुक्त म्हणून रुजू झाले होते. महापालिकेत रुजू झाल्यानंतर समाजविकास तसेच आरोग्य विभागाचेही त्यांनी कामकाजही सांभाळले होते. उपायुक्त मिनीनाथ दंडवते १३ जुलै २०२३ ला महापालिकेत उपायुक्त म्हणून रुजू झाले होते. यांनी यापूर्वी महापालिकेत सहायक आयुक्त म्हणूनही कामकाज केले आहे. सध्या त्यांच्याकडे क्रीडा व जनसंपर्क विभागाचा पदभार होता.
येत्या लोकसभा निवडणूकीमुळे शहरातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. तसेच पोलिस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. काही पोलिस अधिकाऱ्यांनी बदल्याविरोधात मॅटकडे धाव घेतली होती. त्यांच्या बदल्या रद्द झाल्या आहेत.













