- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्लांट बंद करण्याचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२४) :- बांधकामासाठी वापरल्या आणाऱ्या रेडी मिक्स काँक्रीट प्लांटवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक अॅक्शन घेतली असून, ज्या प्लांटमुळे प्रदूषण होतेय आणि नियमांचे उल्लंघन होत आहे, असे प्लांट बंद करण्याचा आदेश ‘एमपीसीबी’चे प्रादेशिक अधिकारी रवींद्र आंधळे यांनी दिले आहेत. पुण्यातही त्याविषयी सर्वेक्षण सुरू असून, इथेही कारवाई केली जाणार आहे.
सध्या या प्लांटमुळे अधिक प्रदूषण होत आहे. त्यामुळे नागरिकांकडून खूप तक्रारी ‘एमपीसीबी’कडे येत आहेत. या तक्रारींवरूनच एक मार्चपासून पुण्यात व पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व्हे करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी नियमांचे पालन केले नसेल, त्या ठिकाणी अधिकारी लगेच नोटीस बजावत आहेत. काही अटी पाळल्या नसतील, तर त्यांना नोटीस देऊन त्यात सुधारणा करण्यासाठी वेळही दिला आत असल्याचे आंधळे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवडमधील ताथवडे, मारुजी, नांदे या ठिकाणचे प्लांट बंद करण्यात आले आहेत. नांदे गावातील एका प्लांटला बंद करण्याची नोटीस दिली आहे. तर मारुंजी येथील सहा प्लांटचे काम या अगोदरच बंद करण्यात आले आहे, असेही आंधळे म्हणाले.
कोणत्याही ठिकाणी बांधकाम करताना, त्या जागेभोवती सुरक्षा कवच लावणे आवश्यक असते, जेणेकरून आजूबाजूला धूळ जाणार नाही. नागरिकांना त्रास होणार नाही. नियमानुसार, बेरिकेट किमान ५ फूट आणि अधिकाधिक २० फुटांचा असणे आवश्यक आहे. तसेच पाण्याचा मारा करावा, जेणेकरून धूळ पसरणार नाही.
रेडी मिक्स काँक्रीट प्लांटमुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या. त्यानंतर, आम्ही अधिकाऱ्याऱ्यांना फील्डवर पाठविले. ज्यांनी नियमावली पाळली नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. सात प्लांट पूर्णपणे बंद करायला सांगितले आहेत. तर ज्यांच्याकडे सुधारणा आवश्यक आहेत, त्यांना नोटिसा दिल्या आहेत. काम बंद पाडणे हा आमचा हेतू नाही, परंतु नियमानुसार काम व्हावे. कोणालाही त्रास होऊ नये, यासाठी आम्ही कारवाई करीत आहोत. अनेक प्लांटनी परवानगीच घेतली नव्हती. त्यांना ते काम बंद करायला सांगितले. – मा. रवींद्र आंधळे , प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे…













