न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मार्च २०२४) :- मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील साडेसहा वर्षांच्या बालिकेचे अपहरण, तसेच लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपी तरुणाला पुण्यातील विशेष न्यायालयाने शुक्रवारी (दि. २२) फाशीची शिक्षा सुनावली.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तरुणाच्या आईला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. कोथुर्णे गावात बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले होते. संवेदनशील खटल्याची जलदगतीने सुनावणी घेऊन विशेष न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी आरोपीला शिक्षा सुनावली.
शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायालयाने आरोपीचे म्हणणे ऐकून घेतले. न्यायालयाने त्याला गुन्हा सिद्ध झाल्याचे सांगितले. पण त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता. मी हा गुन्हा केलाच नाही, असे चोवीस वर्षीय आरोपी सांगत होता. राज्याला हादरवून टाकणाऱ्या या प्रकरणाची जलदगतीने सुनावणी घेत विशेष न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी हा निकाल दिला.
तेजस उर्फ दादा महिपती दळवी (वय २४) असे फाशी झालेल्या नराधमाचे नाव आहे, तर सुजाता महिपती दळवी (वय ४८, दोघेही रा. कोथुर्णे, पवननानगर, मावळ) असे त्याच्या आईचे नाव आहे. याबाबत चिमुकलीच्या वडिलांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ही धक्कादायक घटना २ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी घडली होती. त्या दिवशी नागपंचमीच्या निमित्ताने शाळेला सुटी असल्याने चिमुकली घरासमोर खेळत होती. अचानक ती बेपत्ता झाल्याने गावात शोधाशोध सुरु झाली. पोलिसांनी गावात शोधमोहिम राबविली. दुसऱ्या दिवशी (३ ऑगस्ट) दुपारच्या सुमारास गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मागे झुडुपात या मुलीचा मृतदेह आढळला. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला. पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवित चोवीस तासांच्या आत चिमुकलीच्या शेजारी राहणाऱ्या तेजस दळवीला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याविरोधात कलम ३६३, ३७६, ३७६ ए, ३७६ एबी, ३०२ आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) कलम चार व पाचनुसार गुन्हा सिद्ध झाला. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले.











