न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२४) :- शहरातील घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने चऱ्होलीतील दाट लोकवस्तीत कचरा संकलन केंद्र उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागरिकांचा विरोध असूनही पुन्हा काम सुरू करण्याचा प्रयत्न केला जात असताना शनिवारी नागरिकांनी तिथे धाव घेतली आणि अधिकाऱ्यांना पिटाळून लावले.
पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याचे योग्य रीतीने व्यवस्थापन होण्यासाठी मोशी कचरा डेपो येथे सुमारे ८१ एकर जागा राखीव ठेवण्यात आली आहे. दररोज सुमारे एक हजार टन कचऱ्याची निर्मिती होते. तो मोशी डेपो परिसरात आणला जातो. आता शहरातील घनकचऱ्याचे योग्य रीतीने व्यवस्थापन होण्यासाठी इंदूर शहराच्या धर्तीवर आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कचरा संकलन केंद्रांची उभारणी होणार आहे. मात्र, या कचरा संकलन केंद्रांना नागरिकांचा विरोध होत आहे. च-होलीतील नागरिकांनीही विरोध केला आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार भविष्यात या केंद्रामुळे वारंवार कचऱ्याच्या गाड्या नागरीवस्तीत येणे, कचरा संकलन, कचरा हस्तांतर केंद्र व तेथील प्रक्रिया यातून कचऱ्याची दुर्गंधी पसरण्याची शक्यता आहे. दरम्यान नागरिकांना या प्रकल्पाबद्दल पूर्वकल्पना देण्यात आली नाही. महापालिकेचे अधिकारी मोजणीसाठी आल्यानंतर त्यांना प्रकल्पाची माहिती मिळाली, त्यामुळे नागरिकांनी मोजणीला विरोध केला.
संबंधित मोकळ्या जागेचे मूळ आरक्षण काय आहे? ते आरक्षण ताब्यात घेतले आहे का? आरक्षण ताब्यात असेल तर, ते कचरा संकलन केंद्रासाठी मंजूर करून घेतले आहे का? यासाठी नागरिकांच्या हरकती, सूचना नोंदवण्यात आल्या आहेत का? याबद्दल प्रशासनाने माहिती द्यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.













