न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मार्च २०२४) :- स्वच्छ सर्वेक्षण अभियान स्पर्धेच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक पिंपरी-चिंचवड शहरात येणार असल्याने महापालिकेने शहरातील विविध १७ ठिकाणी तात्पुरते कारंजे उभे केले होते. त्यासाठी ५ लाख १ हजार ५०० रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक शहरात येणार असल्याने शहरातील प्रत्येक प्रभागात १ असे एकूण ३२ ठिकाणी पाण्याचे तात्पुरते कारंजे उभारण्याचा निर्णय स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ भारत प्रकल्प अंमलबजावणी कक्षाने घेतला होता. एका कारंज्यासाठी २९ हजार ५०० रुपये खर्च करण्यात आला. त्याचे कामाचे आदेश आय फिल्म्स मीडिया प्रॉडक्शन्सला १२ मार्च २०२४ ला देण्यात आली.
त्या संस्थेने एका दिवसात अ, ब, ड, ई, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालय हद्दीत १७ ठिकाणी कारंजे उभे केले. त्याबाबतचे प्रमाणपत्र १३ मार्च २०२४ ला स्वच्छ भारत अभियानाच्या समन्वयकांनी दिले आहे. त्याच दिवशी संस्थेने १७ कारंजे उभारल्याचे एकूण ५ लाख १ हजार ५०० रुपयांचे बिल सादर केले. ते बिल अदा करण्यात आले आहे. त्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी कार्योत्तर मान्यता दिली आहे. महापालिकेने नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट केली आहे. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.













